मोदींच्या ‘गॅरंटी’ला ‘तारीख’ नाही! शरद पवार यांची टीका
केंद्र सरकार अनेक गोष्टींची हमी (गॅरंटी) देत आहे. मात्र त्यांच्या हमीला तारीख नाही आणि धनादेशही वठत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
पुणे : केंद्र सरकार अनेक गोष्टींची हमी (गॅरंटी) देत आहे. मात्र त्यांच्या हमीला तारीख नाही आणि धनादेशही वठत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.गेल्या सत्तर वर्षांत अनेक राज्यकर्ते पाहिले. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचेही सरकार पाहिले. मात्र गेल्या दहा वर्षांत मोदी यांची भूमिका देशाला दिशा देणाऱ्या व्यक्तींविषयी जनतेच्या मनात घृणा निर्माण करण्याची आहे. त्यामुळे लोकशाहीची चिंता वाटत आहे. नेहरू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ले करण्याचा आणि त्यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम मोदी यांचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.
इंडिया आघाडीचा पहिला मेळावा शनिवारी काँग्रेस भवनात झाला. या मेळाव्यात पवार यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, खासदार सुप्रिया सुळे, चंद्रकांत हंडोरे, आमदार रवींद्र धंगेकर, डाॅ. विश्वजित कदम, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजनान थरकुडे उपस्थित होते.