भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रणनीती ; २८८ विधानसभा मतदारसंघात संघ आणि भाजप निवडणार ‘ समन्वयक ‘
- लोकसभा निवडणुकीत भाजप आणि संघात समन्वय नसल्याने भाजपला बसला फटका
- लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप आणि संघात समन्वय
- २८८ विधानसभा मतदारसंघात करणार समन्वयाने काम
- पुढील आठवड्यात भाजप आणि संघ पदाधिकारी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक
- घटक पक्षातील उमेदवारांच्या वर राहणार लक्ष
- स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवार उतरविण्यासाठी संघाचा अजेंडा
लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन
लोकसभा निवडणुकीत संघाचा सक्रिय सहभाग नसल्याने भाजपचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला. त्याची पुनरावृत्ती येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समन्वयाने काम करण्याचे धोरण आखल्याचे समजते. त्यादृष्टीने २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये समन्वयक निवडले जाणार असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभेसाठी रणनीती आखली जाणार आहे.
या समन्वयातून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजप पक्षाचाच करण्याचे धोरण असल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्यादृष्टीने पुढील आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यात महत्वाची बैठक पार पडणार आहे. या समन्वयकांशी संपर्क ठेवण्यासाठी प्रदेश पातळीवर संघ पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. संघाचे सह सरकार्यवाह हे विधानसभा निवडणुकीत भाजप-संघ समन्वयासंदर्भात महत्त्वाची जबाबदारी पार पडणार असल्याचे समजते.
समन्वयाच्या अभावाचा लोकसभा २०२४ मध्ये फटका
लोकसभा आणि विधानसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत संघ सक्रिय होता आणि सत्ता परिवर्तन साध्य झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा २०२४ निवडणुकीत भाजपने संघाशी फारसा समन्वय न राखल्याने त्याचा फटका राज्यात भाजपला बसला.
सत्तेबरोबर मुख्यमंत्री भाजपचाच व्हावा
आता महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत महायुतीची सत्ता यावी, मात्र मुख्यमंत्री भाजपचा असावा, यादृष्टीने संघ-भाजप नेत्यांकडून नियोजन करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी शिफारस केलेली अनेक उमेदवारांची नावे केंद्रीय स्तरावरून कापण्यात आली आणि सर्वेक्षणाच्या आधारे अन्य नेत्यांना उमेदवारी देण्यात आली.
उमेदवार निश्चितीचे सर्वाधिकार फडणवीस यांच्याकडे
मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवार निश्चितीचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चित करतानाही भाजपकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणे हस्तक्षेप करण्यात येणार आहे.
महायुतीतील उमेदवाराबाबत होणार चाचपणी
शिंदे-पवार गटाच्या काही वादग्रस्त नेत्यांना किंवा चुकीच्या उमेदवारांबाबत आक्षेप घेऊनही त्यांना उमेदवारी देण्यात आली. ते विधानसभा निवडणुकीत टाळले जाणार असून जनमानसात चांगली प्रतिमा असलेले आणि भ्रष्टाचार किंवा गंभीर आरोप नसलेल्या उमेदवारांचीच निवड करण्यात यावी, अन्य पक्षांमधून नेते आयात करून उमेदवारी देण्यात येऊ नये, त्याऐवजी भाजप नेत्यांनाच उमेदवारी देण्यात यावी, यावर या निवडणुकीत संघ व भाजप नेत्यांचा कटाक्ष राहणार आहे.