सत्तेच्या सारीपाटात ” एकनाथ शिंदे जात्यात .. तर अजितदादा पवार सुपात” ?
- भाजप मुख्यमंत्री पदाला अजितदादानी दिलेल्या पाठिंब्यामुळे शिंदे गट गोत्यात
- निवडणुकी अगोदर फक्त जागावाटपाबाबतच चर्चा, म्हणत शिंदे गटाच्या जखमेवर चोळले अजितदादांनी मीठ
- भाजप केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयामुळे शिंदे गट बॅकफूटवर
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुकीमध्ये २०२४ च्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून भाजपने सर्वाधिक १३२ जागा जिंकत सर्वात मोठा विजय मिळविला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिलेल्या २०२९ ला शत – प्रति शत भाजपच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकल्याचे दिसत आहे.
हे यश ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीणी सह विविध समाजपयोगी योजना राबविल्या त्याचे असले तरी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची सर्वसमावेशक कामगिरीचा या विजयात सिंहाचा वाट आहे; परंतु शिंदे गटाच्या कामगिरीला महायुतीत शिंदे यांच्यानंतर सामील झालेल्या ‘ कानामागून आले आणि तिखट झाले’ ले ( शिंदे शिवसेना समर्थक यांच्या मतानुसार ) अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी भाजपला पाठिंबा दिला. तर एवढ्यावरच न थांबता निवडणुकी अगोदर फक्त जागा वाटपाबाबतच चर्चा झाली होती मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे शिंदे गटाच्या म्हणण्यानुसार ‘ बिहार पॅटर्न ‘ ला ‘ चेक आणि मेट ‘ ( कोणाच्या तरी सांगण्यावरून अशी शंका राजकीय वर्तुळात उपस्थित केली जाऊ लागली आहे) देण्याचा प्रयत्न केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटात सद्या ” एकनाथ शिंदे जात्यात .. आणि अजितदादा पवार सुपात ” ? ( भाजपच्या गुड बुक मध्ये येण्यासाठी अजितदादांची धडपड ची चर्चा ) असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत.
विधानसभेत महायुतीने दणदणीत विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. अजितदादा यांनी शिंदे गटाशी कोणतीही चर्चा न करता मुख्यमंत्री पदासाठी भाजप ला पाठिंबा दिला अशा प्रतिक्रिया शिंदे समर्थक आमदार व्यक्त करताना दिसत आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. ते सरकार अडीच वर्षानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना ४० आमदारांनी पायउतार करीत महायुतीचे सरकार स्थापित केले. त्यावेळी भाजपकडे कमळ चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांची संख्या ही १०५ होती. तरी ही ४० आमदार घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री केले होते.
तर भाजपला १०५ आमदार असताना ही उपमुख्यमंत्री पद घेत महायुतीचे सरकार टिकविण्यासाठी दोन पाऊले मागे घेतली होती. २०२४ च्या निवडणुकीमध्ये महायुतीने ज्या २३४ जागा जिंकल्या आहेत त्यामध्ये १३२ जागांचा वाट हा एकट्या भाजपचा आहे. शिंदे गटाने ५७ तर अजितदादा गटाने ४१ जागा जिंकल्या आहेत. तर चार जागा मित्रपक्ष आणि अपक्ष यांच्या आहेत.
त्यामुळे महायुतीमध्ये मोठा भाऊ हा भाजपच ठरला असल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही अशी चर्चा भाजप वर्तुळात आहे. आणि त्यात विधानसभा निवडणुकीच्या यशात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आर एस एस ने ही भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीस हेच असतील असे केंद्रीय नेतृत्वालाकळविले होते ; परंतु २०२४ ची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्यामुळे आणि निवडणुकीअगोदर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार ( शिंदे समर्थक आमदारांच्या मते बिहार पॅटर्न ) असे वाटच असताना दुसरा घटक पक्ष असणाऱ्या अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपला मुख्यंमत्री पदासाठी ( कोणतीच चर्चा न करता शिंदे गटाच्या आमदारांच्या मतानुसार ) पाठिंबा दिला. त्यामुळे शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी केलीच आणि निवडणुकी अगोदर फक्त जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती , मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीच चर्चा झाली नव्हती असे अजितदादा पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करून टाकल्यामुले एकनाथ शिंदे गटाला कोणते हि दबाव तंत्र वापरण्याबाबत मर्यादा आल्याचे दिसत आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपने दिलेल्या प्रस्तावाला होकार देण्याशिवाय पर्यायच राहिला नाही अशी चर्चा शिंदे समर्थक पदाधिकारी आणि राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. त्याताच गृह आणि अर्थ खाते आमच्या गटाला द्यावे अशी मागणी शिंदे यांनी दिल्ली मध्ये भाजप हाय कमांड यांच्याकडे केल्याचे ही समजते ; परंतु भाजप गृह आणि अर्थ (की जे अजितदादा यांच्या गटाकडे होते ) त्यासाठी हि आग्रही असल्याचे दिसत असल्याने एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना भाजप जे आदेश देईल ते मान्य करावे लागणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळासह महारष्ट्राच्या जनतेमध्ये ही पाहावयास मिळत आहे.
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद नको असे म्हणून त्यांनी आपल्या समर्थक दोन नावांपैकी एकाला उपमुख्यमंत्री पद द्या असे सांगितले होते. मी आपला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून काम करण्याबरोबर पक्ष संघटना अजून मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच मला केंद्रात ही काम करण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे याना दिल्लीला पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी अमित शहा यांनी तिघांशी ही वेगवेगळा संवाद साधल्याचे ही चर्चा आहे. उपमुख्यमंत्री पद नको म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ते पद स्वीकारावे असे भाजप केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याचे (आदेश दिल्याचे ?) समजते.
सात खासदार शिंदे गटाचे आहेत , त्यापैकी कोणाची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागेल आहे. तसेच अजितदादा गटाचे खासदार प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे यांची हि वर्णी केंद्रात लागणार अशी चर्चा आहे. परंतु अजितदादा यांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजप ला पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे शिवसेना गटाची बार्गेनिंग पॉवर कमी करून काय साध्य केले ? याबाबतची चर्चा मात्र महाराष्ट्रभर सुरु आहे. हे जरी खरे असले तरी अजितदादांच्या भाजपचा मुख्यमंत्री पदाला न मागता पाठिंबा खेळीच्या पाठीमागे दडलंय काय ? हे येणार काळच ठरविणार असला तरी सत्तेच्या सारीपाटात ” एकनाथ शिंदे सद्या जात्यात आणि अजितदादा सुपात ” असल्याची चर्चा मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह शहरी भागात सुरु आहे.