रतन टाटा यांचे निधन ; सारा देश हळहळला
लोकमान्य टाइम्स : मुंबई
भारताच्या उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झालं आहे. ते ८६ वर्षाचे होते. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सारा देश हळहळला आहे.
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्याकडून प्रचंड सामाजिक कार्यदेखील झालं. याशिवाय त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवलं. त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्येदेखील आदराने घेतलं जातं. अशा या दिग्गज उद्योगपतीचं निधन झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी १९९१ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं होतं. रतन टाटा यांना १९९१ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला होता. त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत टाटा यांनी सर्वांचे हित जपत काम केलं. सर्वांची मने जिंकली. रतन टाटा यांनी २०१२ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
रतन टाटा एक माणूस म्हणून श्रेष्ठ व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला. ते आपल्या कंपन्यांमधील कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात जाण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी अनेकदा कर्मचाऱ्यांशी तसा संवादही साधला. ते कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रचंड काम करायचे. त्यांच्या प्रेमामुळे कर्मचारीदेखील टाटा यांच्यावर तितकाच प्रेम करायचा. टाटा यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
रतन टाटा यांना २००० मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना २००६ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोष्ठ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना २०१४ मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं. त्यांना २०२१ मध्ये आसाम वैभव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना २०२३ मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं होतं.