देवेनभाऊंच्या साथीदारांवर राष्ट्रवादीतील वस्तादांचा ‘गळ’ ; इतर पक्ष फोडणाऱ्याच्यांवरच आपले कट्टर समर्थकांना थांबविण्याची करावी लागत आहे कसरत
- महायुतीत विद्यमान आमदारांच्या उमेदवारीमुळे तगडे राज्यकर्ते तुतारी घेणार हातात
- कागल आणि इंदापूर येथे भाजपला धक्का देण्याची शरद पवारांची खेळी
- घटक पक्षातीलाच उमेदवारीवरून भाजप मध्ये नाराजीचा सुर
- देवेनभाऊ कसा ड्यामेज कंट्रोल करणार याकडे लक्ष
लोकमान्य टाइम्स : संजय संपतराव शिंदे
एकसंघ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याची महत्वाची भूमिका देवेनभाऊ यांनी बजाविली. परंतु आता जे पक्ष फोडले त्यातील विद्यमान आमदारांना येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म म्हणून उमेदवारी द्यावी लागणार आहे. त्यामुळे घटक पक्षातील ज्याठिकाणी विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात येणार आहे त्याठिकाणी देवेनभाऊ यांना साथ देणारे त्यांचे कट्टर समर्थकांनी विधानसभेची तयारी करून ही महायुतीच्या धर्मामुळे उमेदवारीवरून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे देवेनभाऊंच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
नाराजीचा सुर हेरूनच महाराष्ट्राच्या राजकारणातील वस्ताद अशी बिरूदी ज्यांना मिळाली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाराजांना गळाला लावल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने कागल (कोल्हापूर) आणि इंदापूर (पुणे) येथील अनुक्रमे समरजीत घाडगे आणि हर्षवर्धन पाटील हे हातात तुतारी घेणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ज्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्या देवेन भाऊ यांच्यावर आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपले कट्टर समर्थकांनी पक्ष सोडून जाऊ नये यासाठी ज्या त्या जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या मार्फत प्रयत्न करावे लागत असल्याचे चित्र दिसून येते आहे.
ज्या ज्या वेळी महाविकास आघाडीचे प्रणेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याचा दौरा करतात त्यावेळी ते कोणता ना कोणता राजकीय धमाका करतात हे जणू गणितच बनले आहे. लोकसभेच्या यशानंतर त्यांनी काही झाले तरी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष ही साथ देताना दिसत आहे. काही झाले तरी महाविकास आघाडी च्या अधिपत्याखाली विधानसभा निवडणूक लढवायची आहे त्यादृष्टीने शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले हे प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीने महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांना हेरून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाने आपापल्या परीने पक्षात स्थान देणे सुरू केले आहे.
त्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नाराजाना आपल्या पक्षात घेऊन अजितदादा यांना धक्के दिले आहेत. आता शरद पवार यांनी देवेनभाऊ यांनाच धक्के देणे सुरू केले आहे. त्यांच्या कट्टर समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आणि त्यामध्ये ते यशस्वी होताना दिसत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा मतदारसंघात अपक्ष उभा राहून ही क्रमांक दोन ची मते घेणारे आणि देवेनभाऊ यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ओळख आहे असे समरजीत घाडगे हे तुतारी घेतलेला माणूस हे चिन्ह हातात घेऊन महायुतीचे संभाव्य उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे कट्टर समर्थक हसन मुश्रीफ यांना आव्हान देणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे मन वळविण्यासाठी पक्षाकडून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. पण आता नाही तर कधी नाही असे घाडगे यांच्या समर्थकांनी पवित्र घेतल्यामुळे घाडगे यांनी हातात तुतारी घेतलेला माणूस हे चिन्ह हातात घेतल्यास भाजप आणि देवेनभाऊ यांना हा मोठा झटका मानला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दत्तमामा भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते संभाव्य उमेदवार असणार आहेत. त्यामुळे माजी मंत्री आणि देवेनभाऊ यांचे कट्टर समर्थक अशी ज्यांची ओळख आहे असे हर्षवर्धन पाटील हे ही महायुतीत नाराज असल्याची चर्चा असून ते ही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असा कयास बांधला जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचे काम करूनही पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये धोका होणार असेल तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून तुतारी घेतलेला माणूस या चिन्हावर विधानसभा लढवी अशी भूमिका हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांमध्ये वाढीस लागल्याची चर्चा असल्याचे समजते.