विलास लांडे यांच्यासह चिंचवड पदाधिकाऱ्यांची अजितदादांच्या कार्यक्रमाकडे पाठ
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात लवकरच प्रवेश
अजित पवार गटाला धक्का
एका एका शिलेदाराची वस्तादांच्या तालमीत पुन्हा घरवापसी
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड चे शरद पवार अशी ओळख असणारे माजी आमदार विलास लांडे यांनी बुधवारी ( दिनांक ९) उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे हा अजित पवार गटाला मोठा धक्का मनाला जात आहे. ते सध्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असून ते लवकरच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
बुधवारी अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तिन्ही विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला राज्यात गळती लागली आहे. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड मध्येही तिन्ही विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अजितदादा पवार गटाला सोडून शरद पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात तीन मतदार संघ आहेत. त्यापैकी दोन मतदार संघात भाजपचे तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आमदार आहे. आणि त्याठिकाणी विद्यमान आमदारांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे आपल्या मागणीला महायुतीकडून वाटाण्याच्या अक्षदा लागणार असल्याने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन जर आमच्या उमेदवारीचा विचार केला नाही तर आम्ही पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाऊन तुतारी फुंकणार असल्याचा इशारा अजित पवार गटाला दिला होता.
त्याची दाखल घेत अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांना मंगळवारी बैठकीसाठी पाचारण केले होते. त्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना दादा यांच्या समोर व्यक्त केल्या होत्या. या पदाधिकाऱ्यांना अजित दादा यांनी मी आपल्या उमेदवारीसाठी निश्चित प्रयत्न करीन असा शब्द दिल्याचे समजते. परंतु अजित दादा याना युती धर्म पाळावा लागणार असल्याने ज्या ठिकाणी विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे त्याठिकाणी त्या पक्षाच्याच उमेदवाराला उमेदवारी मिळणार हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही हे माहित झाल्याने बुधवारी पिंपरी चिंचवड येथे विविध विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याला अजितदादांच्या हस्ते पार पडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत होते.
त्यामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विलास लांडे यांनी शरद पवार यांच्या ऐवजी अजितदादा याना साथ दिली. ते शिरूर लोकसभा मतदार संघातून इच्छुक होते. त्याठिकाणी अजितदादा यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील याना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली. उमेदवारी न दिल्यामुळे लांडे हे नाराज झाले होते. तरीही अजित पवार यांनी लांडे याना आढळराव यांचा प्रचार करा असं सांगितल्यावर ही त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला. त्यानंतर विधान परिषदेसाठी विलास लांडे यानाअजित पवार हे संधी देतील असे वाटत होते, परंतु अजित दादा फक्त आणि फक्त लांडे यांचा वापर करत असल्याची भावना लांडे समर्थकांमध्ये वाढिस लागल्यामुळे आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करावा असा रेटा त्यांच्या पाठिराख्यांनी त्यांच्या पाठीमागे लावला होता. तरी ही विलास लांडे हे अजितदादा गटाकडे थांबून होते. परंतु , अजित दादा हे आपल्या कोणत्याच मागणीकडे लक्ष देत नसल्याने लांडे यांनी दरम्यान मोतीबागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याबरोबर चिंचवड विधानसभा मतदार संघातील अजितदादा समर्थक असणारे अनेक माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीनंतर बुधवारी अजितदादा पवार हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतानाही लांडे यांनी त्यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाल्याची जोरदार चर्चा पिंपरी चिंचवड च्या राजकारणात रंगली आहे.
अजित पवार गटातील इच्छुक उमेदवारांनी जर आम्हाला उमेदवारी मिळणार नसेल तर आम्ही तुतारी फुंकणार असा इशारा खुद्द अजित पवार यांनाच दिल्यामुळे शहराच्या राजकारणात एकाच गोंधळ उडाला होता. त्याअनुषंगाने अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत पक्षाची पडझड रोखण्यासाठी पर्यंत केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितल्याचे हि विश्वसनीय वृत्त आहे ; परंतु , महायुती धर्म पाळायचा झाल्यास ज्याठिकणी विद्यमान आमदार आहेत त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने चिंचवड मधील बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.