पुणेमहाराष्ट्र

बारामतीच्या लढतीत पुतण्याला काका वरचढ ; अजितदादांचा १ लाख १६ हजार पेक्षा जास्त मत्ताधिक्याने विजय

युगेंद्र पवार यांना ८० हजार ४९८ मते

लोकसभेला सुप्रियाताई तर विधानसभेला अजितदादा पवार हाच ट्रेंड

लोकमान्य टाइम्स : बारामती

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अजितदादा पवार यांनी त्यांचे पुतणे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा तब्बल १,१६,१८२ या विक्रमी मतांनी दणदणीत पराभव केला. या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना १,९६,६४० तर युगेंद्र पवार यांना ८०,४९८ मते मिळाली.

बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये ” बारामती अजितदादांचीच!”हा संदेश अजित पवार यांनी राज्याला दिला. बारामती कोणाची? पवार साहेबांची की अजितदादांची? याबाबत माध्यमांमध्ये रंगलेल्या या प्रश्नाला बारामतीच्या जनतेने उत्तर दिले. मात्र लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी शरद पवारांचा सन्मान जपला, तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा सन्मान जपत त्यांना विक्रमी मताधिक्य दिले.
मात्र लोकसभा निवडणुकीला “सुप्रियाताई व विधानसभेला अजितदादा!!”असेच धोरण बारामतीकरांनी ठेवल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले.

लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या प्राबल्याखाली असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून ४८ हजार मतांचे लीड हे मोठे आव्हान होते. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक मध्ये झालेल्या चुका टाळत सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतल्याने त्यांच्या बदललेल्या रणनीतीचा फायदा या विधानसभा निवडणुकीमध्ये झाल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होत आहे.

मतदानानंतर बारामतीच्या जिरायती भागातील कौल युगेंद्र पवार यांच्या बाजूने जातोय की काय? अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या पोस्टल मतदानामध्ये युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या गोटात अस्वस्थता पसरली. मात्र त्यानंतर पहिल्या फेरीपासून अजित पवार यांना मोठे मताधिक्य मिळण्यास सुरुवात झाली.

पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत अजित पवार यांचे मताधिक्य वाढत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर तसेच बारामती शहरात मोठा जल्लोष सुरू केला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. मतदान केंद्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे मतमोजणीसाठी सुरुवातीपासून उपस्थित होते. त्याचबरोबर युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार हे देखील मतमोजणी केंद्रात सुरुवातीपासून उपस्थित होते.

अजित पवार व युगेंद्र पवार यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे संदीप चोपडे, वंचित बहुजन आघाडीचे मंगलदास निकाळजे, यांच्यासह एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र या इतर उमेदवारांना या निवडणुकीत मिळालेली मते पाहता कोणताही प्रभाव दाखवता आला नाही. खरी लढत मात्र दुरंगीच झाली.

दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून 48 हजार मताधिक्य अजित पवार यांच्यासाठी फार मोठे आव्हान होते. त्यामुळे लोकसभेतील मताधिक्याचा हा ट्रेंड बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये या निवडणुकीत होऊ नये, याची पूर्ण खबरदारी अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, तसेच पार्थ व जय पवार हे दोन्ही चिरंजीव यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.

अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील, डॉ रजनी इंदुलकर यादेखील प्रचार यंत्रणेत सक्रिय होत्या. बारामती शहरासह तालुक्यातील प्रत्येक समाज घटकाशी या कुटुंबीयांनी संवाद साधत त्यांना आश्वासित करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील या निवडणुकीत अजित पवार यांना फटका बसू नये, याची पूर्ण खबरदारी घेत होते. त्यातच लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी बारामती विधानसभा मतदारसंघात व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय अधिकारी तसेच पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनसन्मान मेळावा बारामतीमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. यानंतरच्या देखील सभांना व कार्यक्रमांना महिलांची अधिकाधिक हजेरी लागावी ,यासाठी राष्ट्रवादीने यशस्वी प्रयत्न केला. त्याचबरोबर कोणताही पदाधिकारी व कार्यकर्ता नाराज होऊ नये, याची खबरदारी देखील घेण्यात आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीप्रमाणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आपल्याकडून कोणत्याही प्रकारची टीका होऊ नये, याची खबरदारी अजित पवार यांनी सुरुवातीपासून घेतली, तशा सूचना देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याचबरोबर मतदान वाढवण्यासाठी राष्ट्रवादीची विशेष यंत्रणा मतदानाच्या शेवटच्या वेळेपर्यंत प्रभावीपणे अजित पवार गटाने राबवली.