सद्यस्थितीला तरी दूरच ; एकनाथ पवारांच्या भाजप प्रवेशाला ‘कोणा’ चा खोडा..?
- एकनाथ पवारांचे जूने संबंध पक्ष प्रवेशाला देणार का बळकटी
- उबाठा गटातील नेत्यावर आरोप करून शिवसेनेला केला जय महाराष्ट्र
- महापालिका निवडणुकीसाठी पवार पुन्हा सक्रिय
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पंचवीस फेब्रुवारीला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने न्यायालयात अंतिम निर्णय होईल..? असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. जर अंतिम निर्णय झाला तर जवळपास तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुका या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होवू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या निवडणूक लवकरात लवकर व्हावेत असे प्रथमच वाटू लागल्याने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये सद्या भाजपने शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खपारे, आमदार अमित गोरखे, प्रदेश, जिल्हा स्तरीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सदस्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने लोकहितासाठी घेतलेले निर्णय तळागळातील शहरवासीयांच्या पर्यंत पोहचण्यासाठी आघाडी घेतली आहे.
लोकसभा निवडणूक २०२५ मध्ये महाविकास आघाडीने यश मिळविल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मविआ मध्ये शहरात मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाले. २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान पार पडले. मविआचीच सत्ता प्रस्थापित होऊ शकते असे बहुतांशी सर्व्हेमध्ये अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु , २३ नोव्हेंबरला मतमोजणी झाली आणि महाराष्ट्रात महायुतीने लोकसभा निवडणुकीत जो पराभव स्वीकारावा लागला होता तो धुवून काढला.
२८८ पैकी २३० जागेवर दणदणीत विजय मिळविला. त्यामध्ये भाजप पक्षाने सर्वाधिक १३२ जागा जिंकत महायुतीत मोठा भाऊ होण्याचा मान मिळविला. त्या खालोखाल शिवसेना एकनाथ शिंदे गटाने ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ४१ जागा मिळविल्या. त्याअनुषंगाने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले आहेत. तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. आता महाराष्ट्राला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. यामध्ये महापालिकांच्या निवडणुकांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा समवेश आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर घरवापासिला सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने विधानसभा निवडणुकीदरम्यान चिंचवड विधानसभा निवडणुकीत ही उमेदवारीवरून अनेक जण पक्ष सोडून जाणार अशी चर्चा होती; परंतु प्रदेश व शहर पातळीवर एकत्रित येत हे बंड शमविण्यात यश मिळविले. परंतु भोसरी विधानसभेत मात्र अनेकजण पक्ष सोडून इतर पक्षात ढेरे दाखल झाले. त्यामध्ये प्रामुख्याने एकनाथ पवार यांचा समावेश आहे. ते लोहा कंधार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटात प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी ही देण्यात आली. त्याठिकाणी त्यांचा फक्त ०९ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला ; मात्र त्यांच्या उमेदवारीवरून उबाठा गटात ए बी फॉर्म देण्यावरून नाट्य रंगले होते. त्यात शेवटी पवार यांनी बाजी मारली होती. परंतु त्यांना त्याठिकाणी पराभवास सामोरे जावे लागले.
विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ पवार यांनी उबाठा गटातील काही नेत्यावर आरोप करून शिवसेनेला २५ जानेवारीला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर ते पुन्हा भाजप मध्ये घरवापासी करणार अशा चर्चा पिंपरी चिंचवड च्या राजकारणात सुरू झाल्या आहेत. पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचे दोन वेळा शहराध्यक्ष, २०१७ महापालिका निवडणुकीत महापालिकेवर कमळ फुलविल्यानंतर एकनाथ पवार हे सभागृहनेते पद यशस्वीपणे सांभाळलं होते.
शहरात त्यांची सुरुवात टेल्को कामगार अशी सुरुवात झाली होती. त्यानंतर कामगार नेता , यशस्वी उद्योजक अशी ओळख निर्माण केली आहे. त्यादरम्यान भाजप पक्षातून राजकीय वाटचाल सुरू केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक अशी ओळख आणि भाजप सत्तेत नसताना शहरात नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात रस्त्यावर उतरणार लढवय्या भाजप पदाधिकारी अशी त्यांची ओळख होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप ची उमेदवारी ही मिळाली होती.
आता २०२५ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप कडून ते लढविण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्याअनुषंगाने ते पुन्हा घरवापसी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ; त्यादृष्टीने ते प्रदेश स्तरावर ही प्रयत्न करीत आहेत ; मात्र त्यांना आपण शहर पातळीवर ही याबाबत बोलून घ्यावे असे सांगण्यात आल्याचे समजते. त्यादृष्टीने ते प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. शहरातील आमदार, राज्य, जिल्हा पदाधिकारी यांच्याशी ही ते संपर्कात असल्याचे बोलले जात आहेत. त्यांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. प्रभागात विविध कार्यक्रम राबविण्यात त्यांनी सुरुवात केली आहे.