महाराष्ट्रराजकीय

…दोन पाऊले मागे घ्या ; एकनाथ शिंदे यांना सल्ला

  • देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या सत्तेसाठी चार पाऊले मागे सरकले होते
  • केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन

लोकमान्य टाइम्स : राजकीय ऑनलाईन

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने २३४ जागा जिंकल्या आहेत. भाजपने सर्वाधिक १३२ जागा जिंकत मोठा भाऊ होण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे ; मात्र एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पदावर संधी द्या अशी आग्रही मागणी शिंदे समर्थक आमदारांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांनी आता दोन पाऊले मागे आले पाहिजे. महायुतीच्या अडीच वर्षात सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने भाजप कडे १०३ आमदार असताना ही देवेंद्र फडणवीस युतीचे सरकार पुन्हा सत्तेत यावे यासाठी चार पावले मागे सरकले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले होते. त्यामुळे आता शिंदे यांनी दोन पाऊले मागे सरकत केंद्रात मंत्रीपद किंवा महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे आणि महायुतीचे सरकार त्वरित स्थापन करण्यास प्रयत्न करावा असा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीने २३४ जागेवर विजय मिळवित एक हाती सत्ता काबीज केली आहे. त्यामध्ये भाजप १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४१ जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सत्ता स्थापण्याच्या दृष्टीने आज २३४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असणारे निवेदन राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केले. त्याअनुषंगे सत्ता स्थापनेला वेग आला आहे. एक हाती सत्तेत मध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा विधानसभा आवारात आहे. भाजपने १३२ जागा जिंकल्या असल्याने आणि आर एस एस ने ही भाजप केंद्रीय नेतृत्वाकडे फडणवीस यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते; त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास महायुतीतील घटक पक्षाचे नेते मत व्यक्त करीत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढविली. त्यामुळे पहिले अडीच वर्षे पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी यासाठी शिंदे समर्थक ५७ आमदार यांनी भाजप वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह केला आहे; मात्र लोकसभेच्या निवडणुकीतील मोठ्या अपेक्षाभंगानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतःला झोकून देत महायुतीची विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या आर एस एस ने फडणवीस यांच्या नावाची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे केली असल्याने तेच मुख्यमंत्री होणार हे नक्की मानले जात आहे.

या निर्णयाची कुणकुण लागल्याने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त आहे. तर त्यांचे समर्थक आक्रमक भूमिका घेतल्याने सत्ता स्थापनेसाठी विलंब होताना दिसत आहे. दुसरा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस ने महायुती म्हणून जो निर्णय असेल तो मान्य असेल असे स्पष्ट केल्याचे विश्वनीय वृत्त आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची नाराजी कशी दूर केली जाणार, ते फडणवीस यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का ? का ते केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. त्याअनुषंगाने केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांना मैत्रीपूर्ण सल्ला देत त्वरित सरकार स्थापन करावे असा सल्ला दिला आहे.