पिंपरी चिंचवडपुणेराजकीय

‘ नाकापेक्षा मोती जड नको ‘  उपद्रव्यमूल्ये देणाऱ्यांना फाटा

  • शहर भाजपने घेतली  पदाधिकारी निवडीच्यावेळी  काळजी    
  • अनुभवी पदाधिकाऱ्यांना ठेवले बाजूला
  • पक्षांतर्गत चर्चा ; राजीनामा नाट्याला कोणाची रसद  
    लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे  
    पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा भारतीय जनता पक्षाकडून शत्रुघ्न काटेंची शहराध्यक्ष (१३ मे ) पदी निवड जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर शहर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र त्याला तीन महिन्याचा कालावधी लोटाला. देर आये दुरुस्त आये म्हणत  शहराध्यक्ष काटे यांनी शहर व जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी (दिनांक २८ ऑगस्ट )प्रसिद्ध केली. प्रसिद्ध  झालेली कार्यकारिणी पाहता आणि त्यामध्ये प्रमुख पदावर संघटन सरचिटणीस हे पद सोडता नाका पेक्षा मोती जड नको म्हणत उपद्रव्यमूल्ये करणाऱ्यांना यादीतून वगळल्याची चर्चा पक्षांतर्गत आणि शहराच्या राजकारणात आहे.

कार्यकारिणी निवडताना आणि शिफारस करताना ही ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनुभवी कार्यकर्त्यांना बाजूला सारून त्यांच्या जागेवर पक्षात नवीन असणाऱ्यांना प्रमुख पदावर संधी देण्याची जाणूनबुजून खेळी केली आहे.  हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या पदाधिकाऱ्यांनी आमची पदाबाबत अहवेलना केल्याचा आरोप करीत पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु या राजीनामा नाट्यावर शहरच्या प्रमुख पदाधिकारी असणाऱ्या आमदार आणि माजी खासदार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया न आल्यामुळे जाहीर झालेली कार्यकारिणी हीच पुढे तीन वर्षे काम करणार हे निश्चित झाले आहे.  त्यामुळे शहराध्यक्ष पॉवर मोडमध्ये असल्याचे दिसत आहे. 

पिंपरी -चिंचवड शहर व जिल्हा भाजप ची १२६ जणांची जम्बो कार्यकारिणी गुरुवारी (दिनांक २८) जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ०१ संघटन सरचिटणीस ०३ सरचिटणीस, ०१ वरिष्ठ उपाध्यक्ष,०७ उपाध्यक्ष,०८ सचिव, युवा मोर्चा, महिला मोर्चा अध्यक्ष, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष, प्रवक्ता  यांच्यासह विविध आघाड्याचे अध्यक्षांसह २७ सदस्य यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डोळ्याखालून घातल्यास असे निदर्शनास येत आहे की  बहुतांशी पदाधिकारी हे संघटनेमध्ये काम करण्याचा अनुभव कमी आहे. यामध्ये शहर कोअर कमिटीमध्ये  शहरातील चार आमदार, माजी खासदार, प्रदेश सदस्य  शहराध्यक्ष यांच्यासह सरचिटणीस, युवा मोर्चा अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष यांचा समावेश होतो. त्याचा सारासार विचार करून  कोअर कमिटी मध्ये येणाऱ्या पदाधिकऱ्यांचा निवड केल्याचे दिसत आहे. 

दोन ते तीन महिन्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी प्रदेश पातळीवरून शहरातील चार आमदार, माजी खासदार आणि शहरातील कोअर कमिटीला यादी पाठविण्याचा अधिकार असतो. त्यामुळे त्यासाठी शहराध्यक्ष यांनी कोअर कमिटीत येणाऱ्या शहर व जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची निवड करताना कोणाचा तरी सल्ला घेऊनच ती निवडल्याची पक्षांतर्गत चर्चा आहे. 

याबाबत शहराध्यक्ष काटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले शहर व जिल्हा पदाधिकारी निवड ही सर्वानुमते झाली आहे.त्यामध्ये कोणताच दुजाभाव केलेला नाही. शहर कार्यकारिणीवर काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ३०० लोकांची नावे प्रदेशाकडे पाठविण्यात आली होती. निवडणूक प्रभारी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या माध्यमातून आमदार शंकर जगताप, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया घेण्यात आली होती.

जे कोणी पदाबाबत नाराज असतील त्याबाबत प्रदेश स्तरावर त्यांची नाराजी कळविण्यात येईल. त्यांची नाराजी दुर करण्यात येईल. येऊन घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता प्रस्थापित करेल असा विश्वास काटे यांनी यावेळी व्यक्त केला.