पिंपरी चिंचवडपुणेबातम्या

अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे आमदार मंत्रीपद न मिळाल्याने झाले नाराज ; अधिवेशन सोडून परतले मतदारसंघात

  • पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली नाराजी
  • महायुतीत सर्वच घटक पक्षात नाराजी वाढली
  • तिन्ही पक्षाचे नेते नाराजी दूर करण्यासाठी सरसावलेत

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. त्यानंतर आता या यादीत पुणे जिल्ह्यातील पिंपरी मतदासंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या नावाची भर पडली आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे बनसोडे यांनी उघड नाराजी व्यक्त करत आपला मतदारसंघ गाठला आहे.

छगन भुजबळांनंतर अण्णा बनसोडे परतले मतदारसंघात

राज्य मंत्रिमंडळाचा १५ डिसेंबर रोजी विस्तार झाला. त्यात ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण तेव्हापासून महायुतीच्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना नाराजीने ग्रासले आहे. विशेषतः राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे थेट अजित पवारांविरोधात बंडाचा झेंडा उगारला आहे. ते राष्ट्रवादीमध्ये राहयाचे की नाही ? याचा निर्णय पुढील २ दिवसांत घेण्याचे संकेत दिलेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे ही मंत्रिपद न मिळाल्यामुळे अधिवेशन सोडून मतदारसंघात परतलेत.

माझा भ्रमनिरास झाला : आ.अण्णा बनसोडे

अजित पवारांनी मंत्रिपद न दिल्यामुळे अण्णा बनसोडे नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर माझे अधिवेशनात मन लागत नव्हते. त्यामुळे मी अधिवेशन सोडून परतलो, असे बनसोडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. ते म्हणाले, मी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून यंदा तिसऱ्यांदा निवडून आलो. त्यामुळे मला मंत्रिपद मिळेल असा मला विश्वास होता. पण माझा भ्रमनिरास झाला. भविष्यात अजितदादा आपला शब्द पाळतील असा मला विश्वास आहे.