पुण्यनगरीतील विसर्जन मिरवणुकीसाठी ८ हजार पोलीस तैनात
- सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा तसेच विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्यावर जबाबदारी
- नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन
- सीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवरद्वारे लक्ष
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
वैभवशाली परंपरा असलेली पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित पार पडावी यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. वरिष्ठांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व राज्य राखीव पोलीस दलासह तब्बल आठ हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार आणि सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा तसेच विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. “विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवरद्वारे लक्ष
विसर्जन मिरवणुकीत, विशेषतः मानाच्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीच्या मार्गांवर, पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत लक्ष ठेवले जाईल. गर्दीच्या ठिकाणी मदत केंद्रे, वॉच टॉवर आणि चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभारले जात आहेत. सोनसाखळी चोरी, खिसेकापू किंवा जबरी चोरी यांसारखे गुन्हे रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांना पथकांमध्ये नेमले आहे.
महिलांच्या सुरक्षितेसाठी दामिनी पथक
महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकेही तैनात असतील. लेझर लाईट्स किंवा इतर घातक दिव्यांच्या वापरास मनाई करण्यात आली असून कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी मदत केंद्रे आणि वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. विसर्जनाची सांगता होईपर्यंत शहर आणि उपनगरांमध्ये पोलिसांची गस्त सुरू राहील. राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि गृहरक्षक दलाचे जवानही या बंदोबस्तात सहभागी आहेत.
पोलीस अलर्ट मोडवर
साध्या वेशातील पोलिसांची असणार गस्त
सीसीटीव्ही, वॉच टॉवरद्वारे ठेवणार लक्ष
महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथके तैनात
मोबाईल चोरटे, पाकीटमारांच्या बंदोबस्तासाठी पथके तैनात
पोलीस फौजफाटा ( बंदोबस्त)
अतिरिक्त पोलीस आयुक्त : ४
पोलीस उपायुक्त : १२
सहायक पोलीस आयुक्त : ३३
पोलीस निरीक्षक : १४१
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक : ५५८
कर्मचारी : ६४४३
होमगार्ड : ९७२
नागरिकांनी ही सहकार्य करावे
पुण्याची विसर्जन मिरवणूक ही परंपरेचा वारसा आहे. नागरिकांचा उत्साह कायम राहावा आणि मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तयार आहे. सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून शिस्त पाळावी.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर.

