अजितदादा यांना मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न
- आमदार रोहित पवारांकडून अजितदादा यांची पाठराखण
- कुर्डू (करमाळा ) महिला उपअधीक्षक फोन कॉल संभाषण प्रकरण
- कसा सापळा रचला जातो हेही अजितदादा यांनी लक्षात घ्यावे
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे, त्यामुळं आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं असे ट्विट करीत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण केल्याने राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, असे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.
सोलापूरच्या महिला पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ कॉलद्वारे अजित पवारांनी थेट महिला अधिकाऱ्यासोबत,’आदेशांचे पालन न केल्याबद्दल कारवाई करू असे ते धमकीच्या स्वरात बोलतानाही दिसले. मात्र, त्यांच्या या परखडपणामुळे राजकीय वर्तुळात घमासान माजले आहे. दरम्यान, नेहमी टीकास्त्र सोडणारे पुतण्या तथा आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांची बाजू मांडली आहे. त्यांनी त्यांची पाठराखण करत राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत अजितदादांची बाजू घेतली आहे.

