पिंपरी-चिंचवड : जुन्यानुभवामुळे ‘दादा’ पितायत ताक ही फुकून
कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर ताकतीची गरज
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जनसंवादच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्नाकडे जातीने लक्ष घातल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुखावले आहेत. हे जरी खरे असले तरी ही स्थानिक पातळीवर त्यांना ताकद देणे तेवढेच आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया खासगीमध्ये उमटताना दिसत आहेत; मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षात ज्या पदाधिकाऱ्यांना ताकद दिली ते त्यांच्या विश्वासास पात्र न राहिल्याच्या जुन्यानुभवामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील ‘कारभाराबाबत’ दादा ‘ताक ही फुकून पिताना’ दिसत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत , नगरपरिषदा, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि २९ महापालिकांच्या निवडणुकां टप्याटप्याने होणार आहेत. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला न्यायालयाने दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्यातील सत्ताधारी महायुती, महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व इतर पक्षांनी तयारी सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील २९ महापालिकापैकी महत्वाची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे ही बिगुल वाजले आहे. त्यादृष्टीने महायुतीसह इतर पक्षानी ही तयारी सुरु केली आहे. त्यामध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. स्थानिक नेत्यांच्या महत्वकांक्षेपोटी राज्यात सत्तेत असणारे महायुती सरकारमधील मित्र पक्ष भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने निवडणूक स्वतंत्र पद्धतीने लढविण्यासाठी तयारी सुरु केल्याचे दिसत आहे.
प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच खरी चुरस आहे. त्याअनुषंगाने भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधान परिषद आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, सदाशिव खाडे यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपने ‘अब की बार सौ पार ‘ चा नारा दिला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने ज्या योजना राबविल्या आहेत त्या शहरातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शहर व जिल्हा कार्यकारिणी च्या माध्यमातून संघटनेच्या जोरावर जोरदार प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येक आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांना जबाबदारी वाटून दिली आहे. त्याचा आढावा प्रदेश पातळीवरून आठवड्याला घेतला जात आहे. तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थानिक आमदारांच्या माध्यमातून ताकद देण्यात येत आहे. संबंधित पदाधिकारी , कार्यकर्त्यांना अडचण आली तर ते थेट संबंधितांना संपर्क करताना दिसत आहेत. त्यामुळे यां कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ही प्रचारात आघाडी घेतली आह; परंतु ज्या प्रमाणात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षासाठी झटताना दिसत आहे त्याप्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते झटताना दिसत नाहीत. शहरात अजितदादा आले कि पुढेपुढे करायचे आणि नंतर ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या ‘ सारखी परिस्थिती दिसत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्यकर्त्यामध्ये याची जोरदार चर्चा आहे. दादा यांनी जनसंवाद च्या माध्यमातून शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यावार भर दिला आहे. हे जरी खरे असले तरी स्थानिक पदाधिकारी आणि कर्यकर्त्यांना राज्यात सत्तेत असून ही म्हणावी तेवढ्या प्रमाणात ताकद मिळत नसल्याचा सूर संबंधितांच्यातूनच उमटताना दिसत आहे.
शहरात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल , माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे, नाना काटे, मंगला कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या नेतृत्व करीत आहेत. २०१७ पर्यंत जवळपास २५ वर्षे अजित पवार यांच्या विचाराची सत्ता महापालिकेवर होती. ती उलथून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी ७७ नगरसेवक निवडून आणूं महापालिकेवर कमळ फुलविले होते. पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. तर काही झाले तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा आपल्या विचाराची सत्ता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी अजितदादा यांनी कंबर कसली आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कामाबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप होत असल्याने सिंग यांची बदली करण्यात आली. त्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याची चर्चा शहराच्या राजकारणात आहे. त्यांच्या जागेवर महामेट्रो चे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पदभार स्वीकारला आहे. तसेच अजितदादा यांनी स्वतः लक्ष घालून शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कर्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीच्याअनुषंगाने शहरवासीयांच्या पुढे जाण्यासाठी फायदा होणार आहे. प्रत्येक गोष्टीला दादांच्याकडे जाण्यापेक्षा स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कर्यकर्त्यांना ताकद दिल्यास त्याचा निश्चित फायदा महापालिका निवडणुकीसाठी होईल अशा भावना आता पदाधिकारी आणि कर्यकर्ते खासगीत व्यक्त करीत आहेत.

