दोन दादात जनसंवाद विरुद्ध लोकसंवाद ‘वार’
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील मित्र पक्षानी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद च्या माध्यमातून शहरवासियांशी कनेक्ट वाढविणे सुरु केले आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे ; तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत अशी ओळख असणारे भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगे यांनी लोकसंवाद च्या माध्यमातून शहरवासियांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लांडगे समर्थकांनी ‘निवडणुकीच्या तोंडावर नव्हे हा आहे रोजचा होणारा लोकसंवाद ‘ अशा समाज माध्यमावर पोस्ट करून निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा यांनी सुरु केलेल्या जनसंवाद ला डीवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोन दादात जनसंवाद विरुद्ध लोकसंवाद वार पहावयास मिळत असल्याची चर्चा शहराच्या राजकारणात सुरु झाली आहे.
एकीकडे महाविकास आघाडीने मतदार याद्यात घोळ असल्याचे कारण पुढे करत निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी मतदार याद्यातील घोळ मिटवावा. निवडणुकीच्या अगोदर अंतिम मतदार याद्या राजकीय पक्षांना द्याव्यात अशी मागणी करीत, निवडणुका सहा महिने पुढे ढकलाव्यात अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील कुरघोड्याच्या राजकारणाने उचल खाल्ली आहे.
प्रमुख महापालिका तब्यात घेण्यासाठी महायुतीमध्ये चढा ओढ सुरु झाली आहे. त्यापैकी एक असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या शहराचा कारभारी (दादा ) कोण? यावरून उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कट्टर समर्थक आणि महाराष्ट्रभर हिंदुत्ववादी आमदार म्हणून ओळख निर्माण केलेले आमदार पैलवान महेश लांडगे यांच्यात शहरातील विकास कोणी केला? यावरून सुप्त संघर्ष सुरु असल्याची चर्चा शहराच्या राजकारणात आहे.
त्यात निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री पवार यांनी पुणे जिल्ह्यात जनसंवाद या टायटल खाली ज्या त्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेत झपाटा लावला आहे. त्याला सर्वठिकाणी प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील करदात्यांचे अनेक प्रश्न जनसंवाद च्या माध्यमातून अजितदादा यांनी सोडविले आहेत. आणि जे प्रशासकीय पातळीवर चे प्रश्न आहेत ते उपस्थित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पी एम आर डी ए आयुक्त, पोलीस आयुक्त, पी डब्लू डी, एम आय डी सी, महावितरण अधिकारी आणि महापालिकेतील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सोडविण्याचे आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी निवडणुकांच्या तोंडावर हा जनसंवाद आयोजित केल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असतानाच भाजप आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी समाज माध्यमावर पोस्ट करीत ‘ निवडणुकीच्या तोंडावर नव्हे हा आहे रोजचा होणारा लोकसंवाद ‘ असे म्हणत अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांच्या जनसंवाद या संवादला डीवचण्याचा प्रयत्न केला आहे ; अशी चर्चा शहराच्या राजकारणात उमाटली आहे.
आमदार लांडगे समर्थकांनी लोकसंवाद विश्वास आणि आपुलकीचा..
पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांच्या समस्याची नियमीत सोडवणूक, निवास स्थानी झालेली गर्दी प्रत्येक अपेक्षाची पूर्ती करण्याचा प्रयत्न, निरंतर विश्वास पिंपरी चिंचवडकरांच्या संकल्प शहराच्या शाश्वत विकासाचा अशी पोस्ट समाज माध्यमावर टाकली आहे. त्यामुळे समर्थकांकडून आमदार लांडगे हे भाजप चे शहराचे नेतृत्व अशा ब्रॅण्डिंग करण्यात येत असल्याची चर्चा आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेवर २५ वर्षे अजित पवार यांचे वर्चस्व होते. ती सत्ता उलथून टाकण्याचे काम दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. हे जरी खरे असले तरी ती सत्ता उलथून टाकण्यासाठी आमदार लांडगे यांनी ही सिंहाचा वाटा उचलला होता.
तसेच अजित पवार यांना उघडपणे पक्षासाठी अंगावर घेण्याचा प्रयत्न आमदार लांडगे यांनी अनेक जाहीर सभेतून अनेक वेळा केला आहे. शहरातील भाजप चे इतर आमदार,पदाधिकारी हे अजितदादा यांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते धाडस फक्त आमदार पैलवान महेशदादा लांडगे हेच करत असल्याचे बोलले जात आहे. त्यात आता आमदार लांडगे समर्थकांनी जनसंवाद ला लोकसंवाद च्या माध्यमातून तोंड देणे सुरु केल्याने शहराचा कारभारी (दादा ) कोण? हे ठरवणारी ही निवडणूक आहे अशी चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

