महायुतीतीलच विद्यमान आमदार असताना अजितदादांच्या पठ्ठ्याने भोसरी विधानसभा लढण्याची दर्शविली तयारी
- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा लढविण्याचा व्यक्त केला मानस
- पत्रकार परिषद घेवून मांडली आपली भूमिका
- जागा लढण्याबाबत वरिष्ठ नेत्यांसमोर मांडणार भूमिका
- अजित गव्हाणे यांनी लढण्याची स्पष्ट भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साह
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविकास आघाडीने चारी मुंड्या चीत केले. आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडीला रोखण्यासाठी महायुती एकत्रित लढणार असल्याचे वरिष्ठ नेते मत व्यक्त करीत आहेत. वरिष्ठ नेते मंडळी वरती हातमिळवणी करत असेल तरी शहर स्थरावर त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होताना दिसत नसल्याने चित्र आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेला राज्यातील महायुती एकत्रित लढणार की वेगवेगळे हे येणार काळच ठरवेल.
त्याअनुषंगाने सर्वांनीच विधानसभेची तयारी सुरू केली आहे. सध्या भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे महेशदादा लांडगे हे विद्यमान आमदार आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. गव्हाणे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अजित गव्हाणे हे शांत, संयमी नेतृत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. महापालिका प्रशासकीय कामांचा मोठा अनुभव आहे. नेहमी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ अशी त्यांची समाजात प्रतिमा आहे. कामांची मुद्देसूद मांडणी करणे, त्यादृष्टीने कामाचा पाठपुरावा करणे, कामानिमित्त आलेल्या प्रत्येकाला अटेंड करून त्याचे काम समजून घेत महापालिका असो या इतर ठिकाणी त्याचा निपटारा करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. या त्यांच्या गुणामुळे सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द स्व.अंकुशभाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपामध्ये सुरू केली. त्यामुळे त्यांना भाजपतील कामाची ही पद्धत माहीत आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे काम केले आहे.
महापालिकेतील एक अभ्यासू पदाधिकारी अशी त्यांची शहरात प्रतिमा आहे. त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना शहराच्या विकासासाठी उत्तम काम केले होते. शहरातील सर्वच प्रभागाला त्यांनी न्याय दिला होता. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यांचा ज्यावेळी कामाच्या अनुषंगाने उल्लेख होतो त्यावेळी अजित गव्हाणे यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहावयास मिळत असल्याने त्यांच्या या जमेच्या बाजू आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू समर्थक म्हणून शहरात त्यांची ओळख आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघात नाराज असणाऱ्या विविध पक्षातील नगरसेवकांना अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अजित गव्हाणे यांनी साद घातल्यानंतर त्यांना अनेक सत्ताधारी नगरसेवकांनी साथ दिली होती. तसेच भोसरी विधानसभा मतदार संघात असणारे त्यांचे नाते गोते मोठे असल्याने अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे मत त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.
राज्यात महायुती असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने भोसरी विधानसभा उमेदवारीवर दावा सांगण्यास सुरुवात केली असली तरी भोसरी विधानसभा मतदार संघावर पक्कड मजबूत असणारे विद्यमान आमदार महेश लांडगे बाजी मारणार हे काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही ; परंतु महायुती मध्ये लोकसभेला एक जागा जिंकूनही राष्ट्रवादी काँग्रेसला वाढलेले महत्व ( केंद्रात भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी जो जादूई आकडा लागतो तो २७२ हा स्वबळावर गाठता आलेला नाही. त्यामुळे घटक पक्षातील खासदार यांना महत्व प्राप्त झाले आहे. जरी एक खासदार निवडून आला तरी त्या पक्षांना आता स्वतः पंतप्रधान नरेन्द्र मोदी किंमत देताना दिसत आहेत. हे एनडीएने आयोजित बैठकीत अजित पवार यांना व्यासपीठावर जे स्थान दिले होते त्यावरून ते अधोरेखित होत होते. ) अधोरेखित होताना दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या पदाधिकार्यांनी विधानसभेवर दावा करण्यास सुरुवात केल्याचे पाहावयास मिळत आहे.
त्याअनुषंगाने २०२४ ची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अजित गव्हाणे यांनी स्वतःच तयारी दाखविल्यामुळे त्यांना भोसरी विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी मिळणार का? २०२४ ची विधानसभा निवडणूक भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट एकत्रित लढणार का वेगवेळे? या जर तर वर निवडणुकीचे भवितव्य अवलंबन असल्याच्या प्रतिक्रिया मतदारसंघात उमटू लागल्या आहेत. त्यामुळे अजित गव्हाणे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियानुसार ही निवडणूक लढण्यास मी तयार आहे, ही निवडणूक का लढविणार आहे याबाबत वरिष्ठ नेत्यांसमोर मी माझी बाजू मांडणार आहे , तसेच वरिष्ठ जो आदेश देतील त्याचे ही पालन करणार अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत मी भोसरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढण्यास तयारीत आहे असा संदेश त्यांनी दिला आहे.