‘मोंथा’ मुळे पुढच्या ४८ तासात महाराष्ट्रात जोरदार पाऊस
- मुंबई-पुण्यात ढगाळ वातावरण आणि मध्यम पाऊस
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
महाराष्ट्रात पुढील ४८ हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किनारपट्टीवरील भागामध्ये तीन नंबरचा लालबावटा फडकवण्यात आला असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाने क्षेत्र, समुद्र खवळला
पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते हळूहळू किनारपट्टीकडे सरकत आहे. या प्रणालीमुळे समुद्रात उंच लाटा आणि वादळी वाऱ्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सुरक्षेच्या दृष्टीने तीन नुंबरचा लालबावटा फडकवला आहे. कोकण किनारपट्टीवरील भागांत विशेषतः सिंधुदुर्ग , रत्नागिरी आणि गोवा परिसरात पुढील काही तासामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किमीपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मोंथा चक्रीवादळामुळे पावसाळा पोषक वातावरण
नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ सध्या वायव्य दिशेने सरकत आहे. हे वादळ मंगळवारी रात्री आंद्रप्रदेशातील काकीनाडा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या दुहेरी हवामान प्रणालीचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रात होत असून राज्यभर पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.
हवामान खात्यानुसार दक्षिण कोकण , गोवा , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मेघगर्जनासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर बुलढाणा, अकोला , वाशीम, अमरावती, नागपूर, वर्धा , भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये कडकडाटासह जोरदार सरींची शक्यता आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि ओपन परिसर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई-पुण्यात ढगाळ वातावरण आणि मध्यम पाऊस
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये सागरी वाऱ्यांचा प्रभाव कायम राहील. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक , अहिल्यानगर , सातारा, कोल्हापूर आणि घाट्माथ्यावरील भागनमध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना , परभणी, नांदेड, हिंगोली आणि बीड येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

