दहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्ड नोंदणी आवश्यक
- राज्य मंडळाच्या संकेतस्थाळावर अपार आयडी ची नोंदणी करण्याच्या राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांचे शाळा व कानिष्ठ महाविद्यालयाना आदेश
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी डिजिलॉकरमध्ये निकाल पत्रिका उपलब्ध व्हावी, यासाठी अपार आयडी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा अपार आयडी उपलब्ध करून त्याची नोंद राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर करावी, अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिले आहेत.

केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करावा असे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार सुमारे दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे कायमस्वरूपी डिजिटल रेकॉर्ड तयार होऊन सर्व शैक्षणिक गुणपत्रिका एकत्रित उपलब्ध होतात.
वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुलभ होते. शैक्षणिक संस्था त्वरित पात्रता पडताळणी करू शकतात. तसेच कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सादर करायची आवश्यकता नाही. सरकारी शिष्यवृत्ती व योजनांमध्ये लाभ मिळणे सुलभ होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी कुठूनही उपलब्ध होतात. केंद्रीकृत आणि सुरक्षित प्रणालीमुळे कागदपत्रे हरवण्याचा धोका राहत नाही. त्यामुळे सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा अपार आयडी उपलब्ध करून त्याची नोंद राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर करावी. त्याचप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे सादर करावा, असे म्हटले आहे.
अपार आयडी कार्ड म्हणजे काय
अपार आयडी (APAAR ID) म्हणजे Automated Permanent Academic Account Registry (स्वयंचालित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी ) होय, जो भारत सरकारचा एक उपक्रम आहे ; हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक १२-अंकी युनिक ओळख क्रमांक (Unique ID) आहे, जो विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती, गुण, पदव्या आणि क्रेडिट्स एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात संग्रहित करतो, ज्यामुळे एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाताना किंवा उच्च शिक्षण घेताना कागदपत्रांची गरज भासत नाही आणि संपूर्ण शैक्षणिक प्रवास सुलभ होतो
