बातम्या

संदीप वाघेरे यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी निश्चित; औपचारिकता बाकी

  • भाजपचे डावपेच माहिती असणारा आणि त्यांना उघडपणे अंगावर घेण्याची धमक  
  • स्थानिक आमदार, पदाधिकारी यांचे दडपण झुगारून टाकण्याची हिम्मत
    लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ पासून सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर सडकून टीका केली; पण, स्थानिक नेत्यांनी सोयीनुसार साधलेल्या चुपीमुळे महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सलग दुसऱ्यांदा विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. भाजपने ८५ नगरसेवकांच्या (एक अपक्ष ) जीवावर महापालिकेवर कमळ फुलविले. एक हाती सत्तेमुळे भाजपच्या कारभारावर अंकुश ठेवणारा विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीला आवश्यक आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक २१ चे पॅनेल प्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून स्वतःसह इतर तीन उमेदवारांना निवडूण आणण्यात महत्वाची भूमिका पार पडणारे,  चुकीच्या कामना चूक म्हण्याची धमक ठेवणारा, स्थानिक असल्याने भाजप आमदार, पदाधिकारी यांच्या दडपशाहीला झुगारून टाकण्याची हिम्मत ठेणारा आक्रमक चेहरा, अशी ओळख संदीप वाघेरे यांची असल्याने त्यांचीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेता म्हणून (अजित पवार याना पाहिजे तसा चेहरा असल्याने ) निवड होईल असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे; त्याबाबत  फक्त औपचारिकता बाकी असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गोटात आहे.
    ———————
    काही झाले तरी यावेळीच्या (२०२६) पिंपरी-चिंचवड  महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता मिळवून पक्षाचे गतवैभव पुन्हा मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कम्बर कसली होती. त्यासाठी त्यांनी राज्यात महायुतीत सत्तेत एकत्रित असणाऱ्या भाजपच्या २०१७ च्या महापालिका निवडणुकीनंतर सत्ता प्रस्थापित केलेल्या भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली होती. विशेष करून त्यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता त्यांना टार्गेट केले होते. शहरात लुटारूंची टोळी फिरत आहे, आमच्या काळात कर्ज नव्हते, ठेवी होत्या, आता महापालिकेवर कर्ज झाले आहे , कर्ज झाले आहे तर ती कामे कोठे आहेत, रिंग करून पैसे लाटले आहेत, भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही, मी पुराव्या शिवाय बोलत नाही अशी टीका करून त्यांनी खळबळ माजविली होती. अजित पवार हे या निवडणुकीच्या काळात भाजपच्या कारभारावर तुटून पडले होते; मात्र त्यांचे शहरातील प्रमुख पदाधिकारी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल , विठ्ठल काटे, अजित गव्हाणे यांनी अजित पवार यांनी जसा आक्रमक पवित्रा घेतला होता तसा पवित्रा न घेता सोयीनुसार टीका केल्याची चर्चा  राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच कार्यकर्ते यांच्यामध्ये आहे. त्याचे पडसाद अजित पवार यांनी घेतलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत ही उमटल्याचे दिसून आले.  
    ————————-
    महापालिका निवडणुकीमध्ये काय झाले? यापेक्षा आता पुढे महापालिकेमध्ये भाजपच्या एक हाती कारभारावर अंकुश लावणे आवश्यक आहे. कारभार योग्य पद्धतीने होतो का ?  पुन्हा, मनमानी करभार करणार यावर लक्ष ठेवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसला चोखपणे करणे आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेता हा आक्रमक चेहरा असणारच केला पाहिजे, असा मतप्रवाह समोर आला आहे.  तशाच सूचना अजित पवारांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना ही दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे निवडणुकीच्या तोंडावर आक्रमकपणे विरोधकांच्यावर आणि त्यांच्या कारभारावर तुटून पडण्यासाठी सीमा सावळे आणि संदीप वाघेरे ही दोन नावे सर्वांसमोर होती. मात्र सीमा सावळे यांचा पराभव झाला. त्यामुळे प्रभाग क्रमांक २१ च्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल प्रमुख म्हणून ज्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण पॅनेल निवडून आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजाविलेले संदीप वाघेरे यांचे एकमेव नाव समोर आहे.  त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ३७ नगरसेवक निवडणून आले आहेत.
    ————————–
    त्यामध्ये अनुभवी चेहरे असणारे ही नावे आहेत; मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोधी पक्षनेता आणि त्याने घ्यावयाची भूमिका जशी अपेक्षित आहे, तशा  सूचना नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी दिल्या आहेत. एक हाती सत्ता असणाऱ्या भाजपच्या कारभारावर लक्ष ठेवण्याबरोबरच जिथे चुकीचे काम होत असेल तेथे विरोध करण्याची भूमिका ठेवण्याचाही सल्ला दिला आहे; हे जरी खरे असले तरी भाजपच्या स्थानिक आमदार, त्यांच्या समर्थकांचे कामाबाबत काही हाताच्या बोटावर मोजण्या एवढे  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विरोध करतील, बाकीचे नगरसेवक कितपत विरोध करणार? का, सत्ताधारी पक्षाबरोबर राहून प्रभागातील कामे आणि लाभ पदरात पडून घेण्यात? धन्यता मानून ते भाजपला अंगावर घेणार का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे . त्यामुळे विरोधी पक्षनेता हा आक्रमक असणारा, भाजप आमदार व त्यांच्या समर्थक नगरसेवकांच्या चुकीच्या कामना चूक म्हणण्याची धमक ठेवणाराच विरोधी पक्षनेता हवा असल्याने या पदावर संदीप वाघेरे हे एकमेव नावच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचीच निवड निश्चित मानली जात असून त्याबाबत फक्त औपचारिक्त बाकी असल्याची चर्चा पक्षांतर्गत आहे.