बातम्या

… का, पुन्हा ये रे माझ्या मागल्या 

-अजितदादांनी घेतली  नवनिर्वाचित नगरसेवकांची  शिकवणी

-राष्ट्रवादी नगरसेवक चुकीच्या कामाना  आक्रमक  विरोध करणार का? 

-का? पुन्हा गिरविणार ज्येष्ठ्यांच्या कृतीचा कित्ता याकडे सर्वांचे लक्ष 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महानगरपालिका निवडणुकीत बोलणे राष्ट्रवादीच्या शहर स्तरावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी टाळले ; तर अजित गव्हाणे यांनी निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवल्याने   शहरात चुकीचा संदेश गेला ; आता तरी शहाणे व्हावा, तोंड उघडा, चुकीच्या कामाना प्रखर विरोध करा असा सल्ला वजा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड च्या नवनिर्वाचित नगरसेवकांना  दिला खरा ; मात्र हा सल्ला संबंधित  मनावर घेणार का? काही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे भाजपमधील नेत्यांशी असणारे  अंतर्गत हितसंबंध यामुळे संबंधित नगरसेवक महापालिकेतील कारभारावर उघडपणे आता तरी  भाष्य करणार  का? हा तसा संशोधणाचाच विषय आहे.

 त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक महापालिकेत दुसऱ्यांदा एका हाती सत्ता प्रस्थापित केलेल्या भाजप विरोधात तोंड उघडणार का? का, पुन्हा ये रे माझ्या मागल्या ची प्रचिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून  येणार हे येत्या काही काळातच समजणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नवनिर्वाचित ३७ नगरसेवकांची पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. निवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन करीत निवडणुकीमध्ये मिळालेल्या यश अपयशावर विस्तृत आढावा घेत, पराभवास कारणीभूत ठरलेल्या कारणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच भविष्यात कोणत्या पद्धतीने महापालिकेत काम करायचे याबाबत कानपिचक्क्या आणि सल्ला यावेळी देण्यात आला.

महापालिकेची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली हाेती. त्यांनी स्वतः उमेदवार ठरविण्यापासून प्रचाराची धुरा सांभाळली. महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांना लक्ष्य केले. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले. केवळ ३७ नगरसेवक निवडून आले. 

मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, ‘महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आजी-माजी आमदारांनी उमेदवारांचा प्रचार केला नाही. अजित गव्हाणे यांनी निवडणूक न लढता मैदानाच्या बाहेर राहणे चुकीचे हाेते. त्यामुळे चुकीचा संदेश गेला. दोन उमेदवारांनी पत्नीला निवडणुकीसाठी उभे न करता कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे होती.

त्यामुळे प्रभागातील इतर भागातील मते मिळाली असती. स्थानिक पदाधिकारी चुकीच्या कारभाराविराेधात काहीच बाेलले नाहीत. इतर उमेदवारांच्या प्रचारात दिसले नाहीत. प्रत्येकाने जबाबदारी घेतली असती तर सत्तेपर्यंत जाता आले असते. आता तरी ताेंड उघडावे. चुकीच्या कामाविराेधात बाेलावे. चुकीच्या कामांना प्रखरपणे विरोध करावा.’ असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.