त्या ६५ जागेवर तरी निवडणुका घ्या
- तारीख पे तारीख वर इच्छुक बेजार
- उद्विग्न नेत्याचा भाजपला सल्ला
- पुण्याप्रमाणे पिंपरी -चिंचवड मधील इच्छुक ही बेजार
लोमान्य टाइम्स : संजय शिंदे
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील साडेतीन ते चार वर्षांपासून रखडल्या आहेत. निवडणुका आता होतील मग होतील अशी आस लावून बसलेले इच्छुक आता पुरते वैतागले आहेत. त्यामुळे कशीही निवडणूक घ्या पण एकदाची घ्या अशीच भावना इच्छुकांची झालेली आहे.
त्यामुळे आता बस झालं, ‘आता कंटाळा आलाय, तुमचे १०० ठरवा अन् उरलेल्या ६५ जागांवर तरी निवडणुका घ्या…’; असा उद्विग्न होऊन उबाठा गटाचा आक्रमक चेहरा अशी ओळख असणारे वसंत मोरें यांनी पुणे भाजपला सल्ला दिला आहे. तीच अवस्था पिंपरी -चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांची झाल्याचे दिसत आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील साडेतीन ते चार वर्षांपासून रखडल्या आहेत. निवडणुका आता होतील मग होतील अशी आस लावून बसलेले इच्छुक आता पुरते वैतागले आहेत. त्यामुळे कशीही निवडणूक घ्या पण एकदाची घ्या अशीच भावना इच्छुकांची झालेली आहे.
निवडणुका तातडीने घ्याव्यात अशा सूचना काही महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला दिल्या होत्या. त्यासाठी राज्य शासनाला चार महिन्याची मुदत देखील देण्यात आली होती. मे महिन्यात दिलेली ही मुदत आता संपली असून या कालावधीत पाऊस, ओबीसी आरक्षणाचा प्रलंबित असलेला मुद्दा आणि इतर कारणांमुळे निवडणूक घेणं शक्य झालं नसल्याचं सुप्रीम कोर्टाला सांगण्यात आला आहे.
त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने अंतिम आदेश दिले असून कोणत्याही परिस्थितीत ३१ जानेवारीच्या पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना शासनाला दिले आहेत. तसंच निवडणूक कार्यक्रम देखील ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे आता जानेवारीपर्यंत निवडणुका होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असला तरी अद्याप निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांना जानेवारीत देखील निवडणूक होतील याबाबत शाश्वती वाटत नाही. कारण यापूर्वी देखील अनेकदा दिलेल्या तारखांवर निवडणुका झालेल्या नाहीत.
त्यामुळे सध्या चाललेल्या तारीख पे तारीख या गोष्टीला वसंत मोरे देखील पुरते वैतागले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने भाजप शहरात आमचे शंभर नगरसेवक निवडून येणार आहेत असं वारंवार ठासून सांगत आहे. त्यानुसार आता वसंत मोरेंनी भाजपने शंभर नगरसेवकांची नावे जाहीर करावीत आणि उर्वरित ६५ जागांवर तरी निवडणूक घ्यावी अशी उद्विग्न मागणी भाजपकडे केली आहे.
वसंत मोरे म्हणाले, “व्हय मी काय म्हणतो…, आज सकाळी चहा पिताना एक विचार मनात आलाय भाजपा म्हणते पुण्यात आमचे १०० नगरसेवक निवडून येणार, मग माझं पुणे भाजपाला एक सांगणं आहे, तुम्हाला जर निवडणुकांची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमचे १०० नगरसेवक एकदा कोण कोण ते ठरवा आणि त्यांची नावे जाहीर करून टाका आणि कृपा करून “उरलेल्या ६५ जागांवर तरी निवडणुका घ्या राव, लय कटाळा आलाय आणि ते इच्छुक तर पार पार बेजार झालेत खर्च करून करून…” असं वसंत मोरे म्हणाले.

