विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताची विजयी सलामी : सूर्यकुमारची बॅट तळपली
- सूर्यकुमारने केली ४९ चेंडूत ८३ धावांची खेळी
- भारतीय गोलदाजांची उत्कृष्ठ गोलंदाजी
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने अमेरिका (यु एस ए) संघाचा २९ धावानी पराभव करुन विजयी सलामी दिली. कर्णधार सूर्यकुमार याच्या ४९ चेंडूत ८३ ची वादळी खेळीमुळे आणि भारतीय गोलंदाजीच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने अमेरिका संघावर विजय मिळविला.
शनिवारी मुंबईच्या वानखेडे मैदानात भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पहिला सामना रंगला. अमेरिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गोलदाजीचा निर्णय योग्यच असल्याचे सिद्ध करीत ७७ धावात भारताचे ६ फलंदाज तंबूत धाडले. एकीकडे भरवशाचे फलंदाज बाद होत असताना भारतीय संघाची सर्व मदार आता फक्त कर्णधार सूर्यकुमार याच्या खेळवरच बाकी होती. भारतवासियांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करीत सूर्यकुमारने ४९ चेंडूत ८३ धावांची महत्वपूर्ण खेळी केल्याने भारतीय संघाने ९ गडयांच्या बदल्यात १६१ धावा केल्या.
अमेरिका संघाकडून शॅडलेनं ४ गडी बाद केले. त्यानंतर हरमित सिंगने २ तर अली खान, मोहम्मद मोहसिन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. भारताच्या १६२ धावाचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघाने २० षटकात ८ गाड्यांच्या मोबदल्यात १३२ धावा पर्यंतच मजल मारली. जसप्रीत बुमराह आजारी असल्याने सामन्याच्या अगोदर दोन दिवसात टी २० क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेला मोहम्मद सिराजने मिळालेल्या संधीचे सोने केले. सलामीच्या सामन्यात सर्वाधिक ३ (२९) गडी बाद केले. अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी २ तर वरुण चक्रवर्तीने १ गडी बाद केला.

