महाराष्ट्रसांगली

गाव करील ते राव काय करील ; सांगली जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार

  • वृक्षतोड केल्याच्या निषेधार्थ बलगवडे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार 
  • मणेराजुरी (तासगाव ) जिल्हा परिषद गटात ग्रामस्थांचा प्रशासनाच्या  विरोधात एल्गार
  • मतदान केंद्र दिवसभर पडले मतदारांच्याविना ओस

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

गाव करील ते राव काय करील या म्हण  (वाक्यप्रचार) अनुभवीण्याची वेळ सांगली जिल्ह्यातील प्रशासन आणि उमेदवारांना आली. दिवसभर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठीचे मतदान केंद्र, मतदान केंद्रावरील कर्मचारी, सुरक्षा साठी तैनात पोलीस कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त बलगवडे गावाच्या मतदान केंद्रावर मतदार फिरकले नसल्याची मोठी घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात घडली आहे. गावकरी एकत्रित आले तर काय होऊ शकते याची प्रचिती प्रशासनाला आल्याचे पहावायचे मिळत आहे. 

सौर उर्जा प्रकल्पासाठी ग्रामस्थांचा विरोध झुगारून वृक्षतोड केल्याच्या निषेधार्थ बलगवडे (ता.तासगाव) येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने  या गावात एकही मतदान झाले नाही. तहसिलदार अतुल पाटोळे यांनी ग्रामस्थांची समजूत काढून मतदान करण्याचे केलेले आवाहनही मतदारांनी झिडकारले.

गावातील सुमारे  २१  एकर जागा  सौर उर्जा प्रकल्पासाठी ताब्यात दिली आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्यावतीने दहा लाख रूपये खर्च करून वृक्षलागवड केली होती. या जमिनीवरील वृक्षतोड करण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. मात्र, हा विरोध डावलून सुमारे  १०  ते १५ हजार झाडे सौर उर्जा प्रकल्पाच्या बांधकामासाठी तोडण्यात आली आहेत. या वृक्षतोडीबद्दल संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी सातत्याने गावकर्‍यांकडून केली जात असतानाही केवळ कागदी घोडे नाचविण्याचे प्रकार घडत असल्याने आज मतदानावर बहिष्कार टाकून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

गावकर्‍यांनी मतदानावर बहिष्कार टाकला असला तरी मराठी प्राथमिक शाळेत सुरू करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी दिवसभर थांबून होते. पोलीस कर्मचारीही मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. मणेराजुरी गटात हे गाव असल्याने उमेदवारांनीही येउन मतदारांना  मतदान करण्याची विनवणी केली. मात्र, मतदारांनी याला दाद दिली नाही. सकाळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्री. पाटोळे यांनी ग्रामस्थांची भेट घेउन मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. मात्र, मतदारांनी ही विनंती दुर्लक्षित करत बहिष्काराचा निर्णय कायम ठेवला.