बातम्यामहाराष्ट्रराजकीय

‘लाडकी बहिण’ शिवसेनेकडून मंत्रिमंडळ विस्तारात झाली ना(आ)वडती..!

  • दोन विधानसभा आणि तीन विधानपरिषद एकूण पाच महिला आमदरांपैकी कोणालाच नाही संधी
  • अडीच – अडीच वर्षे फॉर्म्युलामध्ये संधीची आशा
  • भाजप, राष्ट्रवादीकडून मात्र बहिणींना मंत्रीपदाची ओवाळणी

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

राज्याची उपराजधानी अशी ओळख असणाऱ्या नागपूरमध्ये रविवारी (दिनांक १५) मंत्रिमंडळ शपथविधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. ३३ वर्षानंतर नागपूरमध्ये हा शपथविधी होत असल्याने त्याची भव्यदिव्यता ही मोठी करण्यात आली होती. महायुतीला एकहाती सत्ता देण्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सिंहाचा वाटा असताना तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेली लाडकी बहीण योजना मुळे राज्यातील बहुसंख्य बहिणींनी महायुतीला मतदानातून महायुतीच्या भावांच्या झोळीत भरभरून मताचे दान दिले.

परंतु तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पाच महिला आमदार असताना या महिला आमदारांपैकी कोणाला ही स्थान दिलेले नाही. त्यामुळे शिवसेनेला या बहिणी ना(आ)वडती झाल्या आहेत काय..? असा प्रश्न राज्याच्या राजकारणात उमटला आहे. त्या उलट महायुतीमध्ये घटक पक्ष असणाऱ्या भाजपने पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर या तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे या लाडक्या बहिणींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.

शिवसेनेकडे लाडक्या बहिणींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पाच महिला आमदार

रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीच्या एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ०९ जणांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामध्ये ३३ कॅबिनेट आणि ०६ राज्यमंत्र्यांच्या समावेश असल्याचे पहावयास मिळत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघातून संजना जाधव तर साक्री विधानसभा मतदारसंघातून आमदार मंजुळा गावित या विजयी झाल्या आहेत. तर विधान परिषदेमध्ये नीलम गोऱ्हे, मनीषा कायांदे आणि भावना गवळी असे एकूण पाच महिला आमदार शिवसेनेकडे आहेत.

आज संधी मिळाली नाही, मात्र पुढे ती मिळू शकते..?

यापैकी मनीषा कायांदे आणि भावना गवळी यांच्यापैकी कोणी तरी एकजण मंत्रीपदाची शपथ घेणार असे विश्वसनीय वृत्त होते. परंतु मंत्रिमंडळ विस्तारत मंत्र्यांची संख्या कमी झाल्याने कोणाला संधी द्यायची , त्यातून नाराजी वाढू शकते, त्यामुळे सर्वप्रथम विस्ताराच्या अगोदरच राजकारणात मुरब्बी राजकारणी अशी ओळख निर्माण केलेले तत्कालिन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला जाहीर केला. नागपूर शपथविधी त ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना पुढील अडीच वर्षानंतर निश्चित संधी मिळेल असा विश्वास या जाहीर केलेल्या फॉर्म्युल्यातुन अधोरेखीत होतो. त्यामुळे लाडक्या बहिणीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना आज संधी मिळाली नाही ; मात्र, पुढे ती मिळू शकते असा आशावाद निर्माण झाला आहे.