अबब… मानाचा विड्याची २५ तर ओटीला १५ लाख ११ हजार १०१ रुपयाची बोली
श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवाला उत्साहात सुरुवात
बुधवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
मोशी गावातील श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवातील भंडाऱ्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी (दिनांक १७) लिलाव पार पडला. त्यामध्ये मानाचा विड्याला २५ लाखाची बोली लागली. त्याचा मान विजय पांडुरंग सस्ते यांना मिळाला. मनाची ओटीला १५ लाख ११ हजार १०१ बोली लागली. त्याचा मान आकाश विष्णू सस्ते यांना तर मानाचे फळाला १० लाख ११ हजार १०१ रुपये ची बोली लागली. तिचा मान स्वप्नील दत्तात्रय सासवडे यांना मिळाला.
——————–
हा लिलाव मंगळवारी श्री नागेश्वर महाराज मंदिरात पार पडला. देवीची अर्पण अंगठीला ५ लाख ५ रुपये बोली लागली, तिचा मान संदीप आल्हाट, पहिला लिंबू बोली २ लाख ११ हजार बोली लागली तिचा मान संभाजी बोऱ्हाडे आणि पहिल्या लिलावाचा मान योगेश बोराटे यांना मिळाला असून त्यांनी त्याची बोली २ लाख ५१ हजार लावली आहे.
——————-
मोशीचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांच्या भंडाऱ्यात दिसत असते. यंदा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता. १६), मंगळवार (ता. १७) आणि बुधवारी (ता. १८) या काळात भंडारा, लिलाव, निकाली कुस्त्यांचा आखाडा, तिसऱ्या दिवशी श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव साजरा होणार आहे.
———————–
हजारो भाविकांनी घेतला शाकभाजीचा प्रसाद
सोमवारी (दिनांक १६) श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवात हजारो भाविकांनी शाकभाजी, बुंदीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले. १५० वर्षांची परंपरा जपत मोशीतील ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांच्या भंडारा उत्सवास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी असंख्य भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. मंदिरापासून अमराईपर्यंत महाराजांच्या पवित्र कलशाची टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये ग्रामप्रदक्षिणा घालत मिरवणूक काढण्यात आली.
———————–
श्री नागेश्वर महाराज यांच्या समाधीच्या दिवशी म्हणजे माघ अमावास्येला सर्व गावकरी बुंदी, शाकभाजी हे अन्न शिजवून महाप्रसाद सेवन करतात. हा भंडारा मोशीकरांच्या जीवनातील एक महत्त्वाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. एकाचवेळी शेकडोच्या संख्येने भाविक त्याचा लाभ घेत असतात.
————————-
अखंड नंदादीप
श्री नागेश्वर महाराज यांच्या तपोभूमी असलेल्या आमराईत त्यांच्या एका परमभक्ताने अनेक वर्षांपूर्वी नंदादीप प्रज्वलित केला. आजही तेथील तो नंदादीप तेवत ठेवण्याची ही सेवा या कुटुंबातील सदस्यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे. शिवकालीन कलात्मक शिल्पकलेचा नमुना असलेल्या घडीव दगडांमध्ये तपोभूमीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यावर भंडारा उत्सवानिमित्त विविध फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.
————————-
पवित्र कलशाची मिरवणूक
श्री नागेश्वर महाराज मंदिर, मोशी प्रवेशद्वार व तपोवनभूमी येथे विद्युत रोषणाई, फुलांच्या माळांनी सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. पहाटे श्री नागेश्वर महाराज यांच्या मूर्तीस देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ यांच्या हस्ते महाअभिषेक, टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये मंदिरापासून अमराईपर्यंत ग्रामप्रदक्षिणा घालत पवित्र कलश मिरवणूक काढण्यात आली.
————————-
होम प्रज्वलित
अखंड तेवत असलेल्या नंदादीपाजवळ देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ यांच्या हस्ते पवित्र कलशाची स्थापना करुन होम प्रज्वलित करण्यात आला. महाआरती, पुरणपोळी व शाकबुंदीचा नैवेद्य दाखवण्यात आला. गावामध्ये सर्वत्र धामधूम, खेळण्यांचे विविध आवाज, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गर्दी, प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी पाहुण्यांची रेलचेल, मंदिर आणि आमराईत दर्शनासाठी केलेल्या रांगा असे चित्र होते.
————————-

