पिंपरी चिंचवडपुणेराजकीय

साहेब, दादा की अन्य कोणता पर्याय..! विलासराव लांडे यांच्या मनात नेमके चाललय काय? भोसरी विधानसभा मतदारसंघात निर्माण झालाय ट्विस्ट

  • सद्यस्थितीला विलास लांडे अजितदादा पवार यांच्याबरोबर
  • पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे आणि पुत्र मा. नगरसेवक विक्रांत लांडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर
  • भोसरीतील शिव स्वराज्य यात्रेला विलास लांडे यांची अनुपस्थिती ; परंतु यात्रेच्या तयारीचा खबरदारी
  • विलास लांडे यांची भूमिका ठरणार विधानसभा निवडणुकीसाठी निर्णायक
  • लांडे यांच्या मनाचा ठाव लावणे घरच्यांनाच अशक्य तेथे बाहेरच्या काय

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपला अजेंडा घेऊन मतदारांच्या समोर जाऊ लागला आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने शुक्रवारी (दिनांक ०९) शिवनेरी किल्ल्यापासून खा. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिव स्वराज्य यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा दुपारी भोसरी येथील लांडेवाडी येथे दाखल झाली. जरी ही यात्रा दिग्गज नेत्यांच्या उपस्थित होणार असली तरी शरदचंद्र पवार साहेब प्रेमी आणि सद्यस्थितीला अजितदादा यांच्याबरोबर असणारे माजी आमदार विलास लांडे नेमके उपस्थित राहणार की अनुपस्थित याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

मात्र ते यावेळी अनुपस्थित राहून अजितदादा गटातच असल्याचे दाखवून दिले. परंतु राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या समोरच हा कार्यक्रम होत असल्याने जेथे कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी भेट देऊन तयारी कशी सुरू आहे याची माहिती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिव स्वराज्य यात्रा लांडेवाडीत दाखल झाल्यानंतर मात्र त्या व्यासपीठाकडे लांडे यांनी जाणे टाळले असेल तरी त्या व्यासपीठावर त्यांच्या पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे आणि पुत्र माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांची उपस्थिती बरेच काही बोलून गेली. त्यामुळे लांडे यांच्या मनात नेमके काय सुरू आहे याबाबत पिंपरी चिंचवडसह भोसरीच्या राजकारणात ट्विस्ट पाहावयास मिळत आहे.

लोकशाहीत प्रत्येकाला त्याचा विचार करण्याचा अधिकार आहे हे लांडे कुटुंबियांच्या कृतीतून यावेळी दिसून आले. त्यामुळे साहेब यांच्यावरील प्रेम आणि अजितदादा यांच्यावरील निष्ठा दाखविण्याचा प्रयत्नच जणू विलास लांडे करत आहेत का ? अशी चर्चा भोसरीसह शहराच्या राजकारणात सुरू आहे. दरम्यान विलास लांडे यांचे साडू स्व. माजी नगरसेवक दामोदर गव्हाणे यांचे सुपुत्र माजी स्थायी समिती अध्यक्ष , माजी नगरसेवक, उद्योजक अजितभाऊ गव्हाणे हे भोसरी विधानसभा मतदार संघातून तर खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून त्याचे यांचे जावई मी सेवेकरी फाऊंडेशन चे संस्थापक, उद्योजक सुधीर मुंगसे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून तीव्र इच्छूक आहेत. त्यामुळे लांडे यांच्या परिवारातील इतर सदस्यांनी शिव स्वराज्य यात्रेला ला हजेरी लावली तर बिघडले कोठे ? असा ही एक मत प्रवाह भोसरी विधानसभा मतदारसंघात निर्माण झाल्याची चर्चा आहे.

हे जरी खरे असले तरी यावेळीच्या भोसरी विधानसभा निवडणुकीमध्ये विलास लांडे यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. व्यवसाय, नोकरीनिमित्त राज्यासह पर राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेला विविध समाजासह गावकी भावकिमध्ये त्यांना मानणारा असा मोठा वर्ग आहे. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लांडे यांचे मत कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ते निवडणूक लढणार ? याबाबत ही मतदारसंघात तर्क वितर्क लढविले जात आहेत. ते सद्या महायुतीकडे आहेत; परंतु त्यांचे महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांशी उत्तम संबंध असल्याने ऐन वेळी ते ही मैदानात येवू शकतात अशी ही चर्चा मतदारांच्या मध्ये आहे. विलास लांडे यांच्या मनाचा थांगपत्ता त्यांच्या घरातील सदस्यांना ही लागत नाही तेथे इतरांना ते काय त्यांच्या मनात सुरू आहे याचा थांगपत्ता लागून देणार अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

त्यामुळे विलास लांडे यांनी अजितदादा यांच्यावरच आमची निष्ठा आहे असे दाखवित असताना साहेब यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या कार्यक्रमांची तयारी योग्य पद्धतीने सुरू आहे ना याची ही दाखल घेतली. त्यात त्यांचे सर्वच पक्षाशी उत्तम संबंध असल्याने सद्यस्थितीला ते जरी इच्छुक नाहीत असे वाटत असेल तरी ऐन वेळी ते उमेदवार म्हणून पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको ? अशी महायुती व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांच्यात कानाफुसी सुरू आहे. त्यामुळे ते निवडणूक लढणार की या वेळी ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार हे येणारा काळच ठरविणार असल्याने विलास लांडे नेमके कोणाबरोबर याबाबत मात्र ट्विस्ट पाहवयास मिळत आहे.