पिंपळे सौदागरला स्वतंत्र पोलीस ठाण्याचे सुरक्षा कवच
- पोलीस आयुक्तालयाचा राज्य शासनाकडे अधिकृत प्रस्ताव
- आमदार शंकर जगताप व शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
गेल्या काही वर्षांत आयटी हब आणि वेगाने विकसित होणारे नागरी क्षेत्र अशी ओळख निर्माण झालेल्या पिंपळे सौदागर परिसराच्या सुरक्षिततेसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाबा म्हणजे पोलीस ठाण्याची आवश्यकता ; त्याअनुषंगाने पिंपळे सौदागरसाठी आता स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर होण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
त्याबाबतचा पोलीस आयुक्तालयाने अधिकृत प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. आमदार शंकर जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागरकरांची ही अनेक वर्षांची मागणी आता पूर्णत्वास येत आहे.
पोलीस ठाण्याची आवश्यकता
पिंपळे सौदागर हे शहर केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर राज्यातील एक महत्त्वाचे निवासी आणि व्यावसायिक केंद्र बनले आहे. या भागातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, शाळा आणि वाढती लोकसंख्या पाहता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची नितांत गरज होती. सध्या या भागाला जवळच्या पोलीस ठाण्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असे. ही अडचण लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी यासाठी विशेष प्रयत्न केले
पाठपुराव्याचे फलित:
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्थानिक नागरिकांच्या भावना आणि सुरक्षेचा प्रश्न वारंवार प्रशासकीय बैठकीत मांडला होता. आमदार शंकर जगताप यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून थेट गृह मंत्रालयाकडे हा विषय लावून धरला होता. या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पोलीस आयुक्तालयाने केवळ नवीन पोलीस ठाण्यांचाच नाही, तर प्रशासकीय सुलभतेसाठी नवीन ‘परिमंडळ ४’ चा प्रस्तावही दिला आहे.
काय होईल फायदा?
त्वरित प्रतिसाद: पिंपळे सौदागरमध्ये स्वतःचे पोलीस ठाणे असल्याने पोलिसांची गस्त वाढेल आणि कोणत्याही तक्रारीवर त्वरित कारवाई होईल.
गुन्हेगारीवर वचक: चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि वाहतूक कोंडी यांसारख्या स्थानिक समस्यांवर कडक नियंत्रण मिळवणे सोपे होईल.नागरिकांची सोय: पोलीस तक्रारीसाठी किंवा इतर कामांसाठी नागरिकांना लांबच्या पोलीस ठाण्यात जाण्याची गरज भासणार नाही.
नागरिकांच्या सुरक्षेला प्रधान्य
पिंपळे सौदागरचा विकास झपाट्याने झाला आहे, मात्र त्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वतंत्र पोलीस ठाणे मिळावे, ही आमची जुनी मागणी होती. आमदार शंकरशेठ जगताप यांच्या सोबतीने आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे आज हे शक्य झाले आहे. यामुळे सौदागरमधील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक अधिक सुरक्षित अनुभवतील.
- शत्रुघ्न काटे : शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड
————————-

