पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

गोसेवक रामकृष्ण लांडगे : महाराष्ट्र शासनाच्या मानद पशुकल्याण अधिकारीपदी निवड 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

गोसेवक रामकृष्ण महादेव लांडगे यांची महाराष्ट्र शासनाच्या मानद पशुकल्याण अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे.  या  निवडीमुळे पशुकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळाली असल्याची भावना समाजात जागृत झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

 लांडगे हे गेल्या अनेक वर्षांपासून गोसेवा, पशुसंवर्धन आणि पशुकल्याण या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी निराधार, जखमी व आजारी जनावरांना आश्रय देणे, त्यांच्यावर उपचार करणे, तसेच त्यांच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्याची  सेवा बजावली आहे. विशेषतः रस्त्यावर अपघातग्रस्त झालेल्या जनावरांना तातडीने मदत करणे, त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणे आणि त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारणारा एका संवेदनशील व कर्तव्यदक्ष कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झाली आहे.

तसेच  पशुकल्याणाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध मोहीमा राबवल्या आहेत. गावोगावी जाऊन जनतेला पशुप्रेम, पशुसंवर्धनाचे महत्त्व आणि प्राण्यांप्रती दया व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक नागरिक पशुकल्याणाच्या कार्यात सहभागी होत आहेत.महाराष्ट्र शासनाने त्यांच्या या निस्वार्थ, सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्याची दखल घेत त्यांची मानद पशुकल्याण अधिकारी म्हणून निवड केली आहे. ही निवड केवळ त्यांच्या कार्याची पावती नसून पशुकल्याण क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

या निवडीमुळे आता श्री लांडगे यांना पशुकल्याणाच्या कामात अधिकृत पातळीवर कार्य करण्याची संधी मिळणार असून, शासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून ते अधिक प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पशुकल्याणाच्या विविध योजना आणि उपक्रम अधिक परिणामकारक रितीने राबवले जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.