क्रीडा

विराट कोहीलीचा टी-२० क्रिकेटला रामराम

  • विश्वचषक जिंकल्यानंतर केला निर्णय जाहीर
  • आता पुढच्या पिढीने टी२० क्रिकेट पुढे नेण्याची वेळ
  • आम्हाला ही ट्रॉफी उंचवावयाची होती ; हे एक ओपन सिक्रेट होते

लोकमान्य टाइम्स : क्रीडा वृत्तसेवा

बार्बाडोस येथे भारताने दक्षिण आफ्रिकेवर टी – २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघावर ७ धावांनी शनिवारी (दिनांक २९) विजय प्राप्त करीत विश्विजेतेपदवर नाव कोरले. २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरी पर्यंत चमकदार कामगिरी न करणाऱ्या विराट कोहली ने अंतिम सामन्यात भारतासाठी ५९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारासहित ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्या जोरावर भारताने ७ गाड्यांच्या मोबदल्यात १७६ धावा केल्या. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजी मुळे सामनावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी ट्वेण्टी क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर करीत या जलदगती क्रिकेटला रामराम केला.

विश्वचषक उंचवावयाचा होता ; हे एक ओपन सिक्रेट होते

विराट टी २० मधून निवृत्ती घेताना म्हणाला हा माझा भारतासाठी शेवटचा टी ट्वेण्टी सामना आहे. आम्हाला हा विश्वचषक उंचवावयाचा होता. हे एक ओपन सिक्रेट होते. हे असं नाहीये की आम्ही जर हरलो असतो, तर मी घोषित केले नसते. हे ठरलेलं होतं. आता पुढच्या पिढीने टी २० क्रिकेट पुढे नेण्याची वेळ आहे आणि चमत्कार घडवण्याची वेळ आहे, जे आम्ही आयपीएलमध्ये पाहिले आहे. मला यात काहीच शंका नाही, ते तिरंगा उंच फडकावतील.

ईश्वर महान आहे

विराटने आंतरराष्ट्रीय टी – २० क्रिकेटमध्ये १२५ सामन्यांत ४८.६९ च्या धाव गतीने ४ हजार १८८ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि ३८ अर्धशतक यांचा समावेश आहे. सामनावीर पुरस्कार स्वीकारताना तो अत्यंत भावूक झाला होता. त्यावेळी बोलताना तो म्हणाला हा माझा शेवटचा टी – २० आंतरराष्ट्रीय विश्वचषक होता. हेच आहे जे आम्हाला मिळवायचे होते. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटते की तुमच्या धावा होत नाहीये आणि मग हे असं होतं. ईश्वर महान आहे. आत्ता नाही, तर कधीच नाही, अशी परिस्थितीत होती.’

संघातील प्रत्येकाप्रमाणेच तो या विजयासाठी पात्र होता

विराट पुढे म्हणाला, ‘आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी आम्ही खूप वाट पाहिली होती. मी फक्त एकटा नाही, तर तुम्ही रोहितकडेही पाहा, त्याने ९ टी – २० विश्वचषक खेळले, हा माझा सहावाच होता. संघातील प्रत्येकाप्रमाणेच तो या विजयासाठी पात्र होता. आम्ही जिंकलोय, याचा आनंद आहे. जेव्हा ईश्वराला तुम्हाला काहीतरी द्यायचे असते, तेव्हा तुम्ही कल्पनाही केलेली नसेल अशा मार्गाने तो ते देतो. मी खूप कृतज्ञ आणि नम्र आहे. हे सर्व कठीण होते आणि म्हणूनच भावना व्यक्त झाल्या.