महाराष्ट्र

भक्तनिवासात भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन

  • मंदिर समितीकडून हॉटेल ताब्यात घेण्यात आले
  • भाविकांची लूट कमी करण्यासाठी निर्णय ; भाविकांनी केले स्वागत
  • जेवणाची थाळी मिळणार १०० रुपयात

लोकमान्य टाइम्स : पंढरपूर

येथील विठू माऊलींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्त दर्शनासाठी येत असतात. याकाळात या भाविकांची हॉटेल मालकांकडून मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याच्या तक्रारी मंदिर समितीला प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने सर्व विठ्ठल भक्तांसाठी मंदिर समितीकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी मंदिर समितीकडून हॉटेल ताब्यात घेण्यात आले आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.

हॉटेलला देण्यात आला होता ठेका

विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेले विविध भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. या विविध भक्तनिवासांत असलेल्या ३६४ खोल्यांमध्ये जवळपास रोज १५०० भाविकांच्या निवासाची सोय होऊ शकते. यामध्ये भाविकांना चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी हॉटेलना ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.

किंमतीच्या दरात निम्म्याने कपात : कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कालपासून मंदिर समितीने हे हॉटेल ताब्यात घेतले आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून आहेत. मंदिर समितीने चहा, कॉफी, दूध आणि नाश्त्याच्या दरात निम्म्याने कपात केली आहे. तर जेवणाची थाळी केवळ १०० रुपयात ठेवल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या भक्तनिवासमध्ये वर्षभरात देशभरातून तीन लाखापेक्षा जास्त भाविक निवासासाठी येत असतात.