शेकापच्या जयंत पाटीलांच्या पाठीत शरद पवारांनी खुपसला खंजीर
- नवनिर्वाचित विधान परिषद आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक सदाभाऊ खोतानी केली शरद पवार यांच्यावर जहरी टीका
- शरद पवारांच्या खेळीने जयंत पाटील यांचा गेला बळी
- जयंत पाटील यांचा पराभव झाला की ठरवून केला ? समाज माध्यमावर ही जोरदार चर्चा
लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन
महाविकास आघाडीचे विधान परिषदचे उमेदवार शेकाप पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा शुक्रवारी (दिनांक १२) पराभव झाला. यावर महा विकास आघाडीमध्ये आत्मचिंतन सुरू झाले आहे ; परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक आणि विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार आणि भाजपचे मित्र पक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व शेतकरी चळवळीचे नेते सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांचा पराभव म्हणजे स्वतःला जाणता राजे म्हणविणारे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे झाल्याची जहरी टीका केली आहे. या टीकेमुळे पुन्हा नव्या चर्चेला उधाण आले आहे.
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी शुक्रवारी (दिनांक १२) मतदान पार पडले. त्यामध्ये महायुतीचे ०९ पैकी ०९ तर महाविकास आघाडीचे तीन पैकी ०२ उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीचे मतदान फुटणार आणि महाविकास आघाडीचे तिन्हीही उमेदवार विजयी होणार असा विश्वास महा विकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला होता; मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवातून धडा घेत महायुतीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी उत्कृष्ट नियोजन करून विजय सोपा केला. तर महा विकास आघाडीची मते फुटल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामध्ये काँग्रेसचे ०८, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ०१ (उमेदवार जयंत पाटील यांनी मांडलेल्या मतानुसार) मते फुटली. त्यामुळे महा विकास आघाडीच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.
याबाबत पाटील यांच्या पराभव का झाला ? याबाबत उहापोह सुरू असतानाच फडणवीस समर्थक विद्यमान विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. शेकापच्या जयंत पाटील यांचा त्यांनी राजकीय बळी घेतल्याचे ही एका खासगी न्यूज चॅनल वर बोलताना खोत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जयंत पाटील यांचा पराभवावरून समाज माध्यमावर ही चर्चा सुरू आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचा पराभव झाला की केला ? असा ही प्रश्न उपस्थित केला आहे. उबाठा गटाने मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरविले. आणि त्यांना निवडून ही आणले.
जयंत पाटील यांना रायगड जिल्ह्यात मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे अनंत गीते हे उभा होते. गीते यांना जयंत पाटील यांच्या गटाची जवळ्पास एक लाख मते मिळाली नाहीत. ती मते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पडल्यामुळे गितेंचा पराभव झाला. त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला की केला? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.