विश्वविजेत्या भाविका अहिरेचे शहरात उत्साहात स्वागत
१९ वर्षाखालील मुलींच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत यष्टिरक्षक आणि फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी
मायदेशी परतल्यावर उत्साहात स्वागत ; विलास मडिगेरी व मित्र परिवाराच्या वतीने जल्लोषपूर्ण स्वागत
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
मलेशियात खेळल्या गेलेल्या आयसीसी १९ वर्षाखालील टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने द. आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले. यात पिंपरी चिंचवड शहर व भोसरी मतदारसंघातील १७ वर्षीय अष्टपैलु खेळाडू फलंदाज आणि यष्टिरक्षक भाविका मनोजकुमार अहिरे हिचा सिंहाचा वाटा आहे.
या कामगिरीमुळे पिंपरी चिंचवड शहर व भोसरी मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी प्रभागातील माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी मायदेशी परतणाऱ्या भाविकाच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहून तिचे अभिनंदन आणि स्वागत करीत जल्लोष केला. त्यानंतर सेक्टर १० येथील राहत्या सोसायटी जवळ वाजत गाजत सोसायटी धारकांच्या उपस्थितीत मिरवणूक देखील काढली.
यावेळी सोसायटी धारकांच्या उपस्थितीत भाविकाचा नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी भाविकाचे आई-वडील, मनोजकुमार अहिरे तसेच तीचे प्रशिक्षक संजय हाडके सर आणि सोसायटीतील आजी-माजी पदाधिकारी, सभासद, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

विश्वविजेत्या भाविका अहिरे हीचे अभिनंदन करताना मा.स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी आदी
विजय हा खेळाडूंच्या दृढनिश्चयाचे प्रतीक
पिंपरी चिंचवड शहरातील दोन अष्टपैलू खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. भोसरी मतदारसंघातील १७ वर्षीय अष्टपैलु खेळाडू भाविका मनोजकुमार अहिरे आणि निगडीतील ईश्वरी अवसारे या दोन तरुण महिला खेळाडूंनी पिंपरी चिंचवड शहराची मान उंचावली आहे. यात भाविका अहिरे हिची खेळी विशेष लक्षणीय ठरली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य राहिला. आयसीसी अंडर १९ महिला टी-२० विश्वचषक २०२५ मध्ये विजयी झाल्याबद्दल भारतीय संघाचे सर्वप्रथम अभिनंदन. हा विजय उत्कृष्ट सांघिक कामगिरी तसेच खेळाडुंच्या दृढनिश्चयाचा प्रतिक आहे. यामुळे उदयोमुख खेळाडूंना प्रेरणा मिळेल.
- विलास मडिगेरी , मा.स्थायी समिती अध्यक्ष, मा.नगरसेवक पिं. चिं.महापालिका.