विद्यमानाना पराभव दिसू लागल्याने असे कृत्य
- भोसरी चे इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे यांनी केला आरोप
- विद्यमानानी काय केले ते त्यांनी सांगायचे असते आणि त्यांनी काय कामे केली नाहीत हे विरोधकांनी जनतेसमोर मांडायचे असते
- त्याअनुषंगाने त्यांनी काय केले नाही ते फलकाद्वारे आमच्या समर्थांनी मांडले
- पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या मदतीने हुकूमशाही, दडपशाही पद्धतीने फलक उतरविल्याचा आरोप
- पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना दिले निवेदन
लोकमान्य टाइम्स : भोसरी
निवडणुकीत विद्यमानांनी काय केलं? हे जनतेला सांगायचं असतं तर विद्यमानानी काय कामे केली नाहीत हे विरोधकांनी जनतेपुढे मांडायचं असतं. लोकशाही मार्गानेच आम्ही प्रचार करत आहोत. मात्र हुकूमशाही, दडपशाही पद्धतीने पोलीस आणि महापालिका प्रशासनाची मदत घेऊन आमच्या कार्यकर्त्यांनी लावलेले फलक उतरवण्याचा उद्योग येथे करण्यात आला. पराभव दिसू लागल्यामुळेच भोसरी विधानसभेच्या विद्यमान आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली असून अशा प्रकारचे कृत्य त्यांच्याकडून होत आहे, असा आरोप भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. काही दिवसातच आचारसंहिता देखील लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तळवडे, त्रिवेणी नगर परिसरात भाजप आमदार महेश लांडगे यांना उद्देशून गेल्या दहा वर्षात त्यांनी काय केले नाही हे सांगत ठीक ठिकाणी फ्लेक्स लावले होते. मात्र हे फ्लेक्स भाजप आमदार महेश लांडगे समर्थकांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या मदतीने उतरवले असल्याचा आरोप अजित गव्हाणे समर्थकांनी केला आहे. या संदर्भात अजित गव्हाणे यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
या संदर्भात माहिती देताना अजित गव्हाणे म्हणाले की, लोकशाही मार्गाने आम्ही प्रचार करत आहोत. जे सत्य आहे ते फ्लेक्स द्वारे जनतेसमोर मांडत आहोत. सगळेच उमेदवार आणि प्रत्येक पक्ष फ्लेक्स लावत असतात. परंतु आम्ही फ्लेक्स लावले तर समोरच्या उमेदवाराला दिसायला लागले आहे की, आता त्यांना अपयश येत आहे. गेल्या दहा वर्षात जी कामे त्यांना करता आली नाहीत, ते आम्ही फ्लेक्सच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत आहे. त्यामुळे आपला पराभव होईल या भीतीपोटी त्यांनी अशा प्रकारचा उद्योग केला आहे.
हे फ्लेक्स काढताना त्यांचे कार्यकर्त्यांनी पोलीस तसेच महापालिका प्रशासनाची मदत देखील घेतली. पोलीस आणि महापालिका यंत्रणेवर प्रेशर टाकून त्या ठिकाणी फ्लेक्स काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आम्ही देखील त्याला विरोध केला आहे. परंतु त्यांची दडपशाही, हुकूमशाही त्या ठिकाणी चालू राहिली. मात्र ही हुकूमशाही, दडपशाही शहरातील जनता कदापि खपवून घेणार नाही. जनतेच्या लक्षात येत आहे ही मंडळी कशाप्रकारे काम करत आहेत. त्यामुळे आम्ही आमचं निवडणूक कॅम्पेन हे सुरूच ठेवणार आहोत. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मात्र भोसरी विधानसभा मतदार संघातील मतदार आमच्याबरोबर आहेत, त्यामुळे यावेळी निश्चित बद्दल घडणार असा आम्हाला विश्वास आहे असे मत महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केले.