पिंपरी चिंचवडबाबत अजितदादा यांच्यावर ‘ताक ही फंकून पिण्याची वेळ ‘ ; शहरातील पदाधिकाऱ्याना केले पाचारण
- नवीन शहराध्यक्ष निवडीबाबत होणार चर्चा
- राहिलेल्या पदाधिकाऱ्यांच्यात जोश फुंकण्यासाठी आज पुण्यात सकाळी बैठक
- दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाले महत्व
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. त्यांच्यासहित जवळपास ४० पदाधिकारी त्यामध्ये माजी नगरसेवक, कार्याध्यक्ष, भोसरी विधानसभा अध्यक्ष, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष यांच्यासह शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी यांचा समावेश आहे. या राजीनाम्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
या पक्ष फुटीमुळे पक्षात असणारे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मध्ये मरगळ निर्माण होऊ नये, त्यांना बळ मिळावे व नवीन शहराध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गुरुवारी (दिनांक १८) सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्याची बैठक बोलवली आहे.
ज्यांच्यावर विश्वास ठेऊन शहराचा कारभार हाती सोपविला त्या शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि त्यांच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा (अजित गव्हाणे यांनी राजीनामा देण्याबाबत अजितदादा यांच्याशी सविस्तर चर्चा करून राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे ) दिल्यामुळे अजितदादा पवार यांना नव्याने पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवड करावी लागणार आहे.
भोसरी विधानसभेतील बहुतांशी पदाधिकाऱ्यानी राजीनामा दिला आहे. त्याप्रमाणे पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील काही पदाधिकारी हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी चर्चा आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांना आता पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकारिणी निवडताना ताक फुंकुन पिण्याची वेळ आल्याची चर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात सुरू आहे.
त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये सद्याचे बलाबल पाहता महायुतीतील मुख्य घटक पक्ष असणाऱ्या भाजप कडे भोसरी विधानसभेत आमदार महेशदादा लांडगे आणि चिंचवड विधानसभेत अश्विनीताई लक्ष्मण जगताप या आमदार आहेत. तर पिंपरी विधानसभेत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्याठिकाणी विद्यमान आहेत त्यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे. परंतु अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने ते पिंपरी चिंचवड मध्ये आणखी एखाद्या विधानसभेवर दावा करू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
त्याअनुषंगाने ते गुरुवारी होणाऱ्या पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये चर्चा करू शकतात असे बोलले जात आहे. तसेच पक्षाला कोणी जरी सोडचिठ्ठी दिली तरी पक्ष वाढताच असतो त्यासाठी मरगळ आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने अजितदादा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कानमंत्र नक्की देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.