पिंपरी चिंचवडराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनोखे आंदोलन ; रस्त्यावरील खड्ड्यात केले कमळाच्या रोपांचे रोपण

  • चऱ्होली येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी या आंदोलनात झाले सहभागी
  • रस्त्यांची कामे निकृष्ट पद्धतीने केल्याने पहिल्याच पाऊसामध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे आरोप

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

‘ कमळ म्हणते आम्ही केला आहे विकास….तरी रस्ते अजून कसे आहेत भकास…’ अशा घोषणा देत चऱ्होली बु येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात कमळाच्या रोपांचे रोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासह शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. रस्त्यावरील खड्ड्यात कमळाचे रोपण केल्यामुळे या अनोख्या आंदोलनाची शहराच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे.

चऱ्होली बु येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात कमळाच्या रोपांचे रोपण करताना अजितभाऊ गव्हाणे, विनया तापकीर, प्रदीप तापकीर, ॲड. कुणाल तापकीर, विनायक रणसुभे आदी.

____________________________

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भोसरी विधानसभा मतदारसंघातून इच्छूक अजीतभाऊ गव्हाणे, माजी नगरसेविका विनायाताई प्रदीपआबा तापकीर, युवानेते प्रदीपआबा तापकीर, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे ॲड. कुणाल तापकीर, माजी नगरसेवक पंकज भालेकर, विनायक रणसुभे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्मार्ट आणि मेट्रो सिटी म्हणून पिंपरी- चिंचवड शहराची ओळख आहे. परंतु, या शहराच्या हद्दीतील काही भागांमध्ये आजही खड्डे दिसत आहेत. मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाची पोलखोल केली आहे. रस्त्यांवरील डांबर उखडलं आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने पाणी साचलं आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन पिंपरी- चिंचवड शहराच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी एक अनोखं आंदोलन केलं.

खड्ड्यात कमलाच्या फुलांच रोपण करून आंदोलन करत पालिका प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. अनेक वाहन चालकांना पाठीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ पावलं उचलावीत असं आवाहन अजित गव्हाणे यांनी महानगरपालिकेला केलेलं आहे. या रस्त्यांची दुरुस्ती त्वरित केली नाही तर पुढे महापालिका भवन व आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा ॲड. कुणाल तापकीर, विनाया तापकीर यांनी दिला. यावेळी भाजप सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.