महायुतीत अजित पवार नकोत ; भाजप पदाधिकारी आक्रमक
- शिरूर विचारमंथन बैठकीत भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी मांडली स्पष्ट भूमिका
- अजित पवार पालकमंत्री असल्याने भाजप कार्यकर्त्यांना होतोय त्रास
- आमदारांना त्रास तेथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची काय अवस्था?
- विधानसभेला बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देवू नका
- भाजप आणि राष्ट्रवादीत अंतर्गत धुसपूस वाढली
लोकमान्य टाइम्स : पुणे
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित जागा न मिळाल्याने महायुतीतील धुसपुस सुरू झाली आहे. यापुढे महायुतीत अजित पवार नकोत अशी स्पष्ट भूमिका शिरूरचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे कृषी उत्पन्न समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी माजी मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख, दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष शरद बटे पाटील यांच्या समोर मांडल्याने महायुतीमध्ये एकच खळबळ माजली आहे.
महायुतीतील धुसपुस भाजपच्या पदाधिकाऱ्याने उघपणे मांडून नाराजी व्यक्त केल्याने महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मात्र अंतर्गत वादाने तोंड बाहेर काढल्याचे पाहावयास मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभव कशामुळे झाला याबाबतचं चिंतन बैठक पार पडली त्यावेळी उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केली.
चौधरी पुढे म्हणाले महायुतीत अजित पवार आता नकोतच. अजित पवार पालकमंत्री आहेत. त्याचा त्रास भाजप कार्यकर्त्यांनी सहन करावा लागत आहे. पवार यांनी सुभाष देशमुख, राहुल कुल यांच्यावरही अन्याय केला आहे. ते महायुती मध्ये आले नसते तर भाजप पदाधिकाऱ्यांची महामंडळावर वर्णी लागली असती. परंतु आता ते शक्य नाही. त्यामुळे तुम्ही जर कार्यकर्त्यांची भूमिका ऐकायला आले असाल तर महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढा अशा स्पष्ट शब्दात चौधरी यांनी विचारमंथन साठी आलेल्या भाजप पदाधिकारी यांच्यासमोर मत मांडले.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये समन्वय नव्हता.लोकसभा निवडणुकीतील चुका टाळत विधानसभेची तयारी करावी लागेल. शिरूर लोकसभा मतदारसंघात दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे विधनासभा निवडणुकीत योग्य उमेदवार द्यावा लागेल. विधानसभेला बाहेरून आलेल्याना संधी देण्याऐवजी पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्यांना संधी दिली जावी अशी अपेक्षा शिरूर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यानी यावेळी मागणी केली.
सुदर्शन चौधरी यांच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण ?
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नको अशी चर्चा लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे भाजप ला फटका बसला अशी चर्चा भाजप व शिवसेना एकनाथ शिंदे गटात अंतर्गत सुरू आहे; परंतु सरळ अजित पवार आता महायुतीत नको अशी भूमिका शिरूर विधानसभा मतदार संघातील विचारमंथन बैठकीत मांडण्यात आली. अजित पवार भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचे स्पष्ट भूमिका घेतल्याने महायुतीमध्ये खळबळ माजली आहे.
पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार यांच्यवर तोफ डागली. जिल्ह्यात अनेक आमदार, माजी आमदार आहेत त्यांनी ही आपली भूमिका मांडली परंतु ती वरिष्ठ नेत्यांच्या समोर बंद दाराआड. मात्र चौधरी यांनी महायुतीत अजित पवार नकोच अशी उघड भूमिका घेतली असली तरी त्यांचा बोलविता धनी कोण आहे ? अशी चर्चा मात्र पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे.

