विधानसभेच्या तोंडावर अजितदादा समर्थकांतच अंतर्गत दूही
- आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केले विलास लांडे यांचे नाव न घेता गंभीर आरोप
- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे दोन डझन नगरसेवक शरद पवार गटाला नेऊन दिले
- लोकसभेला बरोबर राहून केले विरोधात काम मोहिते यांनी केला आरोप
- हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा आ. मोहिते यांचे मा. आमदारांना आव्हान
- विलास लांडे मोहिते यांच्या आव्हानाला कसे उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लागून राहिले लक्ष
लोकमान्य टाइम्स : खेड
‘खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात जावायाला तिकीट मिळवून देण्यासाठी तसेच भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचा काटा काढण्यासाठी अजित पवार गटाच्या एका माजी आमदाराने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे दोन डझन नगरसेवक शरद पवार गटाला नेऊन दिले आहेत’, असा गंभीर व खळबळजनक आरोप खेडचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. ‘हिम्मत असेल तर या माजी आमदारांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी,’ असे आव्हान मोहिते-पाटील यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना अप्रत्यक्षरित्या दिल्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा गटात अंतर्गत दूही समोर आली आहे. आता याला विलास लांडे कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘खेड आळंदी विधानसभा मतदार संघात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, मी सेवेकरी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधिर मुंगसे, माजी सभापती रामदास ठाकुर यांच्या नावांची उमेदवारी साठी चर्चा आहे. तर भोसरी मतदार संघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना थोपविण्यासाठी नगरसेवक अजित गव्हाणे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. खेडमधून इच्छुक असलेले सुधीर मुंगसे हे लांडे यांचे जावई आणि भोसरी मतदार संघातून इच्छुक झालेले अजित गव्हाणे हे लांडे यांच्या मेहुणीचे चिरंजीव आहेत. मुळात गव्हाणे व सहकारी नगरसेवक हे यापूर्वी अजित पवार गटात हा लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला.
ते पुढे म्हणाले, ‘जयंत पाटील यांच्या माध्यमातून या घडामोडी घडल्या. हा अजित पवार गटाला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. यावरून अशा नेत्याने आमच्या पक्षात राहण्यापेक्षा राजरोस विरोधात जावे. जास्तच खुमखुमी असेल तर खेडमधून इतरांची पाठराखण करण्यापेक्षा माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी संबंधित माजी आमदारांना दिले आहे. शिवाय उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या कडे तशी तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले.
हा नेता मला नेहमीच टार्गेट करीत आला आहे
चाकण एम आय डी सी मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नसताना इथे कारखानदारांना धमकावले जाते. अशी लक्षवेधी याच माजी आमदार महोदयांनी मांडली होती. स्व आर आर पाटील गृहमंत्री असताना आमच्या अनेक समर्थकांना पोलिसांकरवी घरातुन उचलुन नाहक त्रास दिला. माझ्याबद्दल खोटे नाटे सांगुन शरद पवारांचे मत वाईट बनवले. पुढे तालुक्यात विकास कामे आणताना मला खुप संघर्ष करावा लागला. खेड बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पॅनल असताना यांनी विरोधी पक्षातल्या भाच्याचा उघड प्रचार केला. घरचा भेदी असलेला हा नेता मला नेहमीच टार्गेट करीत आला आहे. लोकसभेला यांनी बरोबर राहुन विरोधात काम केले
- आमदार दिलीप मोहिते पाटील, खेड आळंदी विधानसभा
अजितदादा पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
खेड आळंदी चे आमदार दिलीप मोहिते यांनी विलास लांडे यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला. त्यामुळे विलास लांडे यांच्यावर अजितदादा काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सद्या पिंपरी चिंचवड शहरात अजितदादा गटाकडे हाताच्या बोटावर मोजण्या येवढेच ताकतीचे नेते शिल्लक राहिले आहेत. त्यामध्ये विलास लांडे यांचा वरचा क्रमांक आहे. त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आज ही त्यांच्या बरोबर आहे. अजित पवार गटातील शहरातील पडझड पाहता ते विलास लांडे यांच्यावर दिलीप मोहिते यांनी केलेल्या आरोपामुळे लांब ठेवणार का पुन्हा पक्ष बांधणीच्या अनुषंगाने मोहिते यांनी केलेल्या टीकेला नजरांदाज करीत लांडे यांना सक्रिय करून घेणार याकडे सर्व राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.