पिंपरी चिंचवडराजकीय

‘भोसरी’ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी की शिवसेनेला? रवी लांडगे करणार उध्दव ठाकरे शिवसेना गटात प्रवेश

  • महाविकास आघाडीत भोसरी च्या उमेदवारीवरून रस्सीखेच
  • रवी लांडगे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट
  • भोसरी शिवसेनेलाच असा विश्वास व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती
  • रवी लांडगे शिवसेनेत प्रवेश केल्यास स्वागतच ; भोसरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आनंद

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि काँग्रेस मध्ये प्रवेश करण्यास इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाला प्राधान्यक्रम आहे. त्याप्रमाणेच उमेदवारीवरून ही महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघातही प्रवेश करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि भाजपा पक्षातील नाराजानी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव ठाकरे गट जवळ केल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अजित गव्हाणे व वीस माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे.

तर भाजप पक्षाची पाळेमुळे मजबूत करण्यामध्ये ज्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा असणाऱ्या स्व. बाबासाहेब लांडगे आणि अंकुशभाऊ लांडगे घराण्यातील त्यांचे राजकीय वारसदार २०१७ च्या महापालिका निवडणुकीतील बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे हे विद्यमान भाजप आमदारांच्या विरोधात आवाज उठवीत त्यांच्या विरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत. काही झाले तरी यावेळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रवी लांडगे यांनी तयारी सुरू केली आहे. ते शिवसेना उध्दव ठाकरे यांची मशाल हातात घेण्यासाठी तयारी दाखविली असून त्याअनुषंगाने त्यांनी शनिवारी (दिनांक १०) शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांची भेट घेतली.

भोसरी विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा हक्क आहे. त्याअनुषंगाने २०२४ च्या निवडणुकीमध्ये ही हा मतदारसंघात शिवसेनेचा हक्क असल्याचे खा. राऊत यांनी विश्वास व्यक्त केल्याचे समजते. त्याअनुषंगाने रवी लांडगे यांनी शिवसेनेची मशाल हाती घेण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शिवसेनेत ही उत्साहाचे वातावरण आहे. भाजपचा मुळ विचार जपणारे कुटुंब आणि मतदारसंघात त्यामाध्यमातून त्यांचे असणारे ऋणानुबंध यामुळे रवी लांडगे यांना भेटीगाठीमध्ये मिळत असलेला पाठिंबा पाहता भोसरी विधानसभा निवडणूक ही लक्षवेधी ठरणार आहे हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अजित गव्हाणे, शिवसेनेकडून सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, आणि शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेण्याची तयारी केलेले रवी लांडगे हे तीव्र इच्छूक आहेत. तर महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे हे एकमेव उमेदवार आहेत. त्यांनी महाविकास आघाडी कडून आपल्या पुढे कोणीही येवोत त्यांनी त्यांची तयारी सुरू ठेवली आहे.

रवी लांडगे पक्षात आले तर आनंदच

रवी लांडगे यांनी खा. संजय राऊत यांची भेट घेत शिवसेनेची मशाल हाती घेण्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. त्याबाबत भोसरी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला असता रवी लांडगे हे पक्षात आले तर आनंदच आहे. लांडगे कुटुंबातील एक तगडा पदाधिकारी शिवसेनेत येवून मशाल हाती घेत असेल तर आम्ही निश्चित त्यांचे स्वागत करू .

  • धनंजय आल्हाट, भोसरी विधानसभा मतदरसंघातील प्रबळ इच्छूक