पिंपरी चिंचवडबातम्याराजकीय

अनेक प्रभागात भाकरी फिरणार ; इच्छूक गॅसवर..?

  • सत्ताधारी भाजपमध्ये सर्वाधिक इच्छूक
  • महापालिका स्वतंत्र लढण्याचा भाजप चा निर्धार
  • महायुतीतील इतर घटक पक्षांनी ही चाचपणी केली सुरू
  • महाविकास आघाडीमध्ये ही एकित बेकी

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

भारतीय जनता पक्षाने साई दरबारी , शिर्डी येथे दोन दिवसीय पदाधिकाऱ्यांचे शिबिर घेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यावरून या निवडणुका लवकरच होतील असा अंदाज महाराष्ट्रात बांधला जाऊ लागला आहे. भाजप ने स्वबळाचा नारा देत केंद्रीय आणि राज्यातील योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे जनतेपर्यंत पोहचवा असा आदेश खुद्द केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शिर्डीत दिला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौऱ्यात मंत्री, आमदार यांची शाळा घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश दिल्याचे समजते.

त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये २०१७ प्रमाणे पुन्हा महापालिकेवर कमळ फुलविण्याच्या दृष्टीने चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभेत तयारी सुरू करण्यात आल्याचे समजते. महायुतीत सतेते सहभागी असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटने ही सावध भूमिका घेत पुढे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ही तयार आहोत असा संदेश भाजपकडे पाठविला असल्याचे समजते. परंतु २०१७ ची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून विविध प्रभागाच्या अनुषंगाने प्रशासक आयुक्त शेखर सिंग यांच्याबरोबर बैठकांचा धमाका लावून विकास कामे पूर्ण करण्याकडे भर दिला आहे.

महायुतीतील तिन्ही पक्षांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली असताना महाविकास आघाडीत सद्या राज्य स्थरावर वेगवेगळी मते असल्याने सद्या तरी मविआ मध्ये एकीत बिकी असल्याचे दिसत आहे. हे जरी खरे असले तरी शरद पवार यांनी याबाबत विचार विनिमय केला जाईल असा विश्वास व्यक्त केल्याने पिंपरी चिंचवड मविआ मधील कार्यकर्ते यांचे पवारांच्या खेळीकडे लक्ष लागले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्रित काम करणाऱ्या मविआ महापालिका निवडणुकीत ही एकत्रित समोर जायचे असे खासगीत विचार व्यक्त करत आहेत. परंतु यावेळी होणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये विविध पक्ष भाकरी फिरविण्याचा विचार करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त असल्याने इतर पक्षाबरोबरच विजयाची हमी असणाऱ्या सत्ताधारी पक्षातील अनेक इच्छुक मात्र गॅसवर असल्याचे पहावयास मिळत आहेत.

विधानसभा निवडणुकीत अनेक पदाधिकारी यांनी विविध पक्षात प्रवेश केले. त्या जागेवर दुसऱ्या फळीतील युवा कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. त्यातच आता पुन्हा इतर पक्षात प्रवेश करणारे पुन्हा भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षातील इच्छूक युवा कार्यकर्त्यात नाराजीचा सूर उमटला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत विविध पक्षाच्या वरिष्ठांनी आम्ही तुम्हालाच उमेदवारी देवू असे शब्द दिले होते अशी चर्चा आहे. त्यामुळे पक्षाचे प्रामाणिक पणे काम करणाऱ्या इच्छुकांमध्ये ही घालमेल सुरू आहे. पक्ष वाढीसाठी जरी बाहेरून पक्षात आलेल्यांना शब्द दिला असला तरी आम्ही नेहमीच पक्षाबरोबर प्रामाणिक राहून काम केले असल्याने आम्हाला यावेळी तरी महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी अशी इच्छा अनेक कार्यकर्ते आता खासगीत बोलू लागले आहेत.

तर २०१७ च्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी असो या विरोधी पक्षात जे नगरसेवक निवडून आले त्यातील बहुतांशी सदस्यांनी फक्त मिरविण्यातच धन्यता मानल्याने अनेक प्रभागात मतदार मते व्यक्त करीत आहेत. सत्ताधारी पक्षात ही २०१७ मध्ये १२८ पैकी ७७ नगरसेवक तिन्ही विधानसभा मतदारसंघात मतदारांनी निवडून दिले होते. या संधीचे अनेक नगरसेवकांनी सोने केले ; तर काही प्रभाग काही नगरसेवकांनी संख्येनुसार क्षेत्रानुसार वाटणी करून घेत फक्त टक्केवारीत धन्यता मानली होती अशी खासगीत चर्चा होत होती. त्यामुळे ज्या कामासाठी नगरसेवकांची मतदारांनी मतदान करून महापालिका सभागृहात पाठविले तेथील कामे ही ज्या त्या आमदार यांच्याकडे जावून सोडवावी लागत होती. त्यामुळे नगरसेवक यांचे काय काम ? असा सवाल ही ज्या त्यावेळी उपस्थित केले होते.

त्यामुळे यावेळी भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभागामध्ये सत्ताधारी असो या विरोधी पक्ष नगरसेवक उमेदवारीबाबत भाकरी फिरविणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे जवळपास २०१७ ची पंचवार्षिक कार्यकाळ पूर्ण होवून जवळपास अडीच ते पावणे तीन वर्षे प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्याकाळात प्रभागातील मतदारांना खुश करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांनी आता पर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केल्याची ही चर्चा आहे. त्या इच्छुकांमध्ये भाकरी फिरविण्यात कोणाचा नंबर लागेल हे माहीत नसल्याने अनेक जण गॅसवर असल्याची चर्चा पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रभागात रंगली आहे.