पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती मजबूत ;लाडकी बहिणीसह कोणतीही योजना बंद होणार नाही

  • उपमुख्ययमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये व्यक्त केला विश्वास
  • राज्याच्या विकासाचे इंजिन म्हणून शहराकडे पाहिले जाते

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

राज्याच्या तिजोरीत खडखडाट, राज्य दिवाळखोरीत निघाल्याची टीका विरोधक करत आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका मी राज्याचा दहावा अर्थसंकल्प मांडला आहे. महाराष्ट्र राज्य मजबूत असून आर्थिक परिस्थिती चांगली आहे. देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) महाराष्ट्राला मिळतो. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने लाडकी बहिणीसह कोणतीही योजना बंद होणार नाही असा विश्वास त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते.

राज्याच्या विकासाचे इंजिन म्हणून शहराकडे पाहिले जाते

अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड औद्योगिनगरी आहे. त्यात शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे मूलभूत गरजा पोहचविता आल्या पाहिजेत. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सुविधा पुरविताना ताण येत आहे. राज्याच्या विकासाचे इंजिन म्हणून शहराकडे पाहिले जात. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कायदा सुव्यवस्था चांगलीच राहिली पाहिजे.चुक होता कामा नये, दहशत, गुंडगिरी, दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. 

शहर नियोजन पद्धतीने वाढले पाहिजे

१०० वे नाट्य संमेलन शहरात झाले. अखिल भारतीयसाहित्य संमेलन ही या शहरात पार पडले. शहर नियोजन पद्धतीने वाढले पाहिजे. त्यातून विकासकामे झाली पाहिजेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. योग्य व सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी काम सुरू आहे. या कामामध्ये सातत्य राहिले पाहिजे.

नागरिकांना मोकळेपणाने फिरता आले पाहिजे

लोकप्रतिनिधीच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना आयुक्तांना दिली. राहिलेली कामे जोमाने होतील, मेट्रोचे कामे लवकर कशी होतील, याकडे पाहिले पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. नागरिकांना मोकळेपणाने फिरता आले पाहिजे. अशा सूचना पोलीस आयुक्त यांना दिल्या आहेत.

सर्वांचे सहकार्य अपेक्षित

शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारसरणी अंगिकारून आपण समजात वावरले पाहिजे. देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य करत असताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.  पिंपरीत माता रमाई स्मारकाचे काम हाती घेण्याची सूचनाही पवार यांनी केली.

लोकार्पण आणि भूमिपूजन

बोपखेल येथे मुळा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या लोकार्पण,  पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने स्थायी आदेश पुस्तिकेचे प्रकाशन व नवीन शासकीय वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्याचा कार्यक्रम होणार आहे. इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल (आयसीसीसी)चे लोकार्पण,  निगडी प्राधिकरण येथे हरित सेतू विषयक कामांचे लोकार्पण, पिंपळे सौदागर येथील पवना नदीवर उभारलेल्या पुलाचे लोकार्पण,  रक्षक चौकात सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर भुयारी मार्ग (सबवे ) उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प टप्पा एकचे शुभारंभ,  मुळा नदीवर सांगवी ते बोपोडी दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण झाले.