लोहा लोहेको काटता है..! भाजपाला उबाठा गटाचा धक्का ; रवी लांडगे यांनी शेकडो समर्थकांसह हातात घेतली मशाल
- रवी लांडगे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन
- ५०० गाड्यांच्या ताफ्यासह भोसरी ते मातोश्री वाहनाच्या रांगा
- भोसरी विधानसभेवर रवी लांडगे समर्थकांची दावेदारी
- लांडगे यांच्या पक्ष प्रवेशावेळी शिवसेनेचे सर्व जूने निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते ही उपस्थित
- पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार रवी लांडगे यांनी व्यक्त केला विश्वास
- महाविकास आघाडीत उमेदवारीवरून ट्विस्ट
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीची पाळेमुळे रुजवून पक्ष वाढीसाठी ज्यांचा सिंहाचा वाटा असणारे स्व.बाबाशेठ लांडगे व स्व. ॲड. अंकुशभाऊ लांडगे यांचा राजकीय वारसा चालविणारे २०१७ मधील महापालिका निवडणुकीतील बिनविरोध नगरसेवक युवा नेतृत्व रवी लांडगे यांनी शेकडो समर्थकांसह मंगळवारी (दिनांक २०) मातोश्री येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. काही झाले तरी यावेळी भोसरी विधानसभा मतदार संघावर भगवा फडकविण्यासाठी भाजपाला शह देण्याच्या अनुषंगाने ‘ लोहा लोहेको काटता है ‘ याचा वापर करीत उबाठा गटाने भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का दिला अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
रवी लांडगे यांनी विधानसभेचे बिगुल वाजल्यापासून भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. त्यांनी मतदारसंघात याबाबत वातावरण निर्मिती केली. विद्यमान आमदारांच्या कार्यप्रणालीवर प्रथम उघडपणे बोट ठेवले. भाजप पक्षातील निष्ठावंत असणाऱ्या आमच्या कुटुंबाला प्रत्येक महत्त्वाच्या पदापासून जाणूनबुजून बाजूला ठेवत अन्याय केला. त्याबाबतचा पाढा रवी लांडगे यांनी मतदारसंघातील सर्व प्रभागात जाऊन वाजविण्यास सुरुवात केली.
त्यांच्या या पवित्र्यात मतदारसंघात युवकांचा आणि ज्येष्ठांचा पाठिंबा मिळू लागल्याची चर्चा रंगली आहे. मतदारसंघात स्व. बाबाशेठ आणि अंकुशभाऊ लांडगे यांनी घडविलेले कार्यकर्ते , पदाधिकारी यांनी रवी लांडगे यांनी यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी अशी गळ घातली होती. त्याला रवी लांडगे यांनी ही हिरवा कंदील दाखविला आणि भोसरी मतदारसंघात रवी लांडगे यांचा झंझावात सुरू झाला. जवळपास दीड दोन महिन्यापासून रवी लांडगे यांनी मतदारसंघ पिंजून काढला. त्यांनी विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांचे नाव घेत त्यांच्या कार्यप्रणालीवर टीका केली. तसेच मी विधानसभा का लढणार आहे याबाबत जागोजागी आपली भूमिका उघडपणे स्पष्ट केली.
त्यांच्या भूमिकेला त्यांच्या सर्व अनुयायांनी साथ दिली. त्यादृष्टीने जोरदार तयारी केली आहे. परंतु ते भाजपा सोडून कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत त्यांनी सस्पेन्स ठेवला होता. त्यांच्या वाढदिवसाच्या अगोदर त्यांनी आपण उबाठा गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या समर्थकांनी त्यांचा वाढदिवस ही मोठ्या दिमाखात साजरा केला. त्या वाढदिवसाला ही सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रवी लांडगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यामुळे रवी लांडगे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
काही झाले तरी यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी तयारी केली असून महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघावर उबाठा गटाने दावा केला आहे. त्याअनुषंगाने रवी लांडगे यांनी मंगळवारी (दिनांक २० ) मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, खा. संजय राऊत, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख आमदार सचिन आहिर यांच्या उपस्थित मोठ्या शक्ती प्रदर्शनात उबाठा गटात प्रवेश केला. यावेळी राज्य संघटक एकनाथ पवार , सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांच्यासह शिवसेना उबाठा गटाचे पिंपरी चिंचवड शहर चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीची उमेदवारी अंतिम ; महाविकास आघाडीत उमेदवारीवरून ट्विस्ट
भोसरी विधानसभा मतदार संघात भाजप चे आमदार महेश लांडगे हे नेतृत्व करीत आहेत. सद्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये विद्यमान आमदार आहेत त्यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट एकत्र असणाऱ्या महायुती मध्ये भोसरी विधानसभेचे उमेदवार आमदार महेश लांडगे हेच असणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून मंगळवारी प्रवेश केले रवी लांडगे, सुलभा उबाळे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अजित गव्हाणे हे तीव्र इच्छुक आहेत. त्यामुळे महाविकासआघाडी मध्ये उमेदवारीवरून सद्यस्थितीला ट्विस्ट निर्माण झाला आहे.