भोसरी विधानसभा मतदारसंघात ” लक्ष्मी ” कृपा जोरात ?
- मतदारसंघात ही जोरदार चर्चा
- ज्येष्ठापासून तरुण मतदारांपर्यंत सर्वांना खुश करण्यासाठी प्रयत्न
- एका फोनवर लाखो रुपयांचा निधी मंजूर करून कामांचा शुभारंभ
- पाच वर्षे किंमत नसणाऱ्या कार्यकर्त्याना प्राप्त झाले महत्व
- तरुण म्हणतायत निवडणूक पाच वर्षांनी कशाला घेताय वर्षांनीच घ्या की ?
लोकमान्य टाइम्स : भोसरी
विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता सात ते आठ दिवसात लागेल. राज्यभर महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख विरोधी पक्षाबरोबर इतर पक्षांनी तयारी केली आहे. देशात औद्योगिकनगरी अशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात तीन मतदारसंघ आहेत. त्यामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघाचा समावेश आहे. पैकी भोसरी मतदारसंघाची शहरासह पुणे जिल्ह्यात नेहमीच चर्चा असते. मग निवडणूक आल्यानंतर भोसरी ची चर्चा होणार नाही तर नवलंच.
महायुतीचे उमेदवार अंतिम झाला आहे. महाविकास आघाडीकडून दोन ते तीन दिवसात उमेदवार निश्चित होईल. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून इच्छूक असणाऱ्या पैकी एक उमेदवार निश्चित होईल. त्याअनुषंगाने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्यकजण प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याअनुषंगाने “अभि नाही तो कभी नही” असे म्हणत मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मतदारांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून प्रयत्न केले जात असल्याची जोरदार चर्चा भोसरी मतदार संघात आहे. त्यासाठी ज्येष्ठापासून ते तरुण मतदारांना खुश करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचे सध्या वातावरण पहावयास मिळत आहे.
त्यात विधानसभा निवडणूक ही नेमकी सणासुदीच्या दिवसामध्ये आली आहे. त्यामुळे मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवारांना मोठी दमछाक होणार आहे अशी चर्चा असतानाच सध्या मतदारसंघातील मतदारांना खुश करण्यासाठी त्यांनी व्यक्त केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी इच्छुकांची धावफळ सुरु झाली आहे. इतर वेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ज्यांच्याजवळ जाण्यासाठी ही दहा वेळा विचार करावा लागत होता , त्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे. प्रत्यके प्रभागात मंडळाच्या कार्यकर्त्याना महत्व प्राप्त झाले आहे. या मंडळातील कार्यकर्त्यांनी मागणी केलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जाऊ लागले आहेत. मतदार संघात जणू लक्ष्मीची कृपाच होऊ लागली आहे.
फक्त फोन करा आणि काय सुविधा पाहिजे ते सांगा, लगेच कामाची माहिती घेऊन त्याची वर्क ऑर्डर काढून आठवड्यात भरात कामाचा शुभारंभ करून घेण्यात येत आहे. आचारसंहिता लागण्या अगोदर फक्त काम सुचवा आणि लगेच काम सुरू करण्यात येत असल्याने मतदारांनी ज्याच्याकडून काम होईल त्याच्याकडून ते मंजूर करून घेत जास्तीत जास्त कामे पदरी पडून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये काही पदाधिकारी यांनी वैयक्तिक कामे ही पुढे रेटून ती करून घेण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. ही कामे जास्त करून समाविष्ट गावात जोर धरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ज्येष्ठ पासून ते युवा मतदारापर्यंत सर्व जण कामाला लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे निवडणूक ही पाच वर्षाने नव्हे तर वर्षाला घ्या ? असे तरुण मतदार आता विनोदाने म्हणू लागले आहेत.