भोसरीतील अर्बन स्ट्रीट कामातील निष्काळजीपणाच्या विरोधात महाविकास आघाडीचे ठिय्या आंदोलन
- संबंधीत कंपनीवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करा
- त्या कुटुंबातील एका व्यक्तीला मनपा सेवेत रुजू करून घ्या
- महाविकास आघाडीचे आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलन
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
भोसरीतील अर्बन स्ट्रीट कामामध्ये हलगर्जीपणा मुळे आदिनाथनगर (भोसरी) येथील दिलीप बवले यांचा नाहक बळी गेला. त्यामुळे त्यांच्यावर आधारित असणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कामातील निष्काळजीपणामुळे बवले यांना आपला जीव गमवावा लागल्याने संबंधीत कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
तसेच त्यांच्या पत्नी यांना मनपा सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त यांच्याकडे केली असून त्याअनुषंगाने पीडित कुटुंबासह आयुक्त दालनासमोर बसून अर्बन स्ट्रीट च्या कामात निष्काळजीपणा केलेल्या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी महाविकास आघाडीकडून शुक्रवारी (दिनांक ११) ठिय्या आंदोलन केले.
यावेळी मृत पावलेल्या बवले कुटुंबासह महा विकासआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अजित गव्हाणे, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे रवी लांडगे, सुलभाताई उबाळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्यासह महा विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
न्याय मिळेपर्यंत लढाई सुरूच ठेवणार : अजित गव्हाणे
अर्बन स्ट्रीटच्या कामातील हलगर्जीपणामुळे बवले यांना नाहक जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. कर्ता पुरुष गेल्यामुळे घर कोसळले आहे; त्यामुळे त्यांच्या पत्नी या बी ए बी एड आहेत त्यांना मनपा च्या शाळेमध्ये रुजू करून घेत त्या कुटुंबाला न्याय द्या. ही घटना घडून जवळ पास तीन ते साडे तीन महिने होऊन गेले आहेत. तरी त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला आहे. त्या ताईंना जोपर्यंत मनपा सेवेत रुजू करून घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमची लढाई सुरूच ठेवणार.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न : रवी लांडगे
दिलीप नवले यांची दुचाकी उड्डाण पुलाखाली अर्बन स्ट्रीट कामातील निघालेल्या मातीचा मारून ठेवलेल्या ढीगाऱ्यावरून घसरून रस्त्याकडेला जो कटडा होता त्यावर डोके आदळून वर आलेल्या सळ्यामुळे जीव गमवावा लागला. त्या अपघातानंतर वर आलेल्या लोखंडी सळ्या कट करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे ; मात्र त्याठिकाणी सळ्या घुसून पडलेले रक्त तेथेच होते असा पुरावाच छायाचित्रसह दाखवून रवी लांडगे यांनी माध्यमांसमोर संबंधित कंपनीला उघडे पाडले. जवळपास ३८ कोटी रुपये खर्च करून हा अर्बन स्ट्रीट ज्या वाहतुक कोंडी कमी करण्याच्या उद्देशासाठी बांधला आहे तो उद्देश येथे पूर्णपणे अपयशी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कामात ज्यांनी निष्काळजीपणा केला आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय पाहिजे ; आणि बवलेताई यांना मनपा ने नोकरीत सामावून घेतले पाहिजे.
.