महाराष्ट्रराजकीय

लागा तयारीला..! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे लवकरच वाजणार पडघम

  • महायुतीला लागले वेध
  • अडीच ते तीन वर्षापासून रखडल्या होत्या निवडणुका
  • विधानसभेतील यशामुळे महायुती या निवडणुकीसाठी सकारात्मक

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला कौल देत घवघवीत यश संपादन करून दिले. या यशामुळ गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील तीन ते चार महिन्यांच्या आत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी महायुतीतील घटक पक्ष ही सकारात्मक असल्याचे विश्वनीय वृत्त आहे.

राज्यातील महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत. यामध्ये इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण आणि प्रभागरचना याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देखील मिळालेली होती.

अशातच गेल्या अडीच वर्षांपूर्वी राज्यात ज्या पद्धतीने सरकार स्थापन झाले, त्या गोष्टींचा विचार करता या निवडणुका यापूर्वी घेण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याचा सर्वात मोठा फटका हा राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारला बसला असता अशी भीती राजकीय नेत्यांना होती.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे आता या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता पुढील तीन ते चार महिन्यांत या निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य देखील ठरणार होते. तसेच या निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडीला कशाप्रकारे यश मिळते यावर या निवडणुका पुढील वर्षात होणार का? हे ठरणार होते. मात्र आता या निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका तातडीने घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.