स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शहर भाजपाने कसली कंबर ; शहरात १ ते १० जानेवारीला भाजप नवीन सदस्य नोंदणी अभियान
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १०० टक्के विजयासाठी सदस्य नोंदणी आवश्यक : जिल्हा प्रभारी आमदार हेमंत रासने
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला १०० टक्के विजयासाठी आतापासूनच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सदस्य नोंदणीच्या कामाला लागा, असे आवाहन पिंपरी चिंचवड जिल्हा प्रभारी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी केले. त्याअनुषंगाने भाजपने राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
त्याअनुषंगाने भाजप पिंपरी चिंचवड कार्यालय येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सदस्यता नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके, अभियानाचे संयोजक संजय मंगोडेकर, शितल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, कविता हिंगे, अजय पाताडे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, निलेश अष्टेकर, संदीप नखाते, राजेंद्र बाबर, प्रसाद कस्पटे, संतोष तापकीर, सह संयोजक विजय शिनकर, अभिषेक देशपांडे, अमेय देशपांडे यांच्यासह प्रकोष्ठ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार हेमंत रासने म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठे यश संपादन केले आहे. महायुतीच्या सत्ता स्थापनेत भाजपा पदाधिकारी – कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. हा विजय निरंतर ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये १०० टक्के विजयासाठी आतापासूनच तयारी सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने १ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत राज्यभर नवीन सदस्य नोंदणी आणि नवीन मतदार नोंदणी अभियान हाती घेतले आहे. यासाठी मंडल आणि बूथ स्तरावर संयोजक आणि सहसंयोजक यांच्यासह पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी आपल्याला सोपवून दिलेल्या प्रभागांची जबाबदारी सांभाळून अभियान यशस्वी पार पाडायचे आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक अभियानाचे संयोजक संजय मंगोडेकर यांनी केले. आभार नामदेव ढाके यांनी मानले.