शंकर जगतापांच्या हातात काय आहे ?
- राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश बहाल यांचा सवाल
- महापालिका निवडणुकीबाबत महायुतीचे वरिष्ठ निर्णय घेतील
- भाजपला स्वतंत्र लढायचे असेल तर आम्ही ही तयार
- अजितदादांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी दोन दिवसापूर्वी महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढणार असल्याची भूमिका जाहीर केली. १२८ जागा आम्ही पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे शहर पातळीवर नसून ते महायुतीचे वरिष्ठ नेत्यांना आहेत. त्यामुळे शंकर जगताप यांच्या हातात काय आहे ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहाल यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे खरेच महायुतीतील घटक पक्ष महापालिका निवडणुकीमध्ये एकत्रित की स्वतंत्र पणे निवडणुकीला सामोरे जाणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
भाजपचे शहराध्यक्ष आ. शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक ही स्वतंत्रपणे लढणार असे जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण या निवडणुकीस स्वतंत्रपणे सामोरे जात असल्याचे जाहीर करीत सर्वच्या सर्व म्हणजे १२८ जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केले. २०१७ च्या निवडणुकीमध्ये ७७ जागेवर भाजपने विजय मिळविला होता. येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित २०१७ निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिकंण्यात येतील असा विश्वास जगताप यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हे जरी खरे असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्रित निवडणुका लढलेल्या घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार ) आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणे आवश्यक होता असा मतप्रवाह पुढे येऊ लागला आहे.
त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार ) गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक कशा लढवायच्या त्याचा सर्वाधिकार हा महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे शंकर जगताप यांच्या हातात काय आहे ? त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. जर पिंपरी चिंचवड भाजपला स्वतंत्र निवडणूक लढायचीच असेल तर त्यासाठी आम्ही ही तयार आहोत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जो निर्णय अजितदादा देतील तो आमच्यासाठी अंतिम राहील.