पिंपरी चिंचवडराजकीय

अजितदादा देणार काकांना धक्का ; भोसरी विधानसभेतून होणार सुरुवात

  • अजित गव्हाणे समर्थक वीस माजी नगरसेवक पुन्हा हातावर बांधणार घड्याळ
  • माजी आमदार विलास लांडे यांनी केले सुतावेच

लोकमान्य टाइम्स : भोसरी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आगामी तीन ते चार महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याअनुषंगाने सत्ताधरी भाजपाने पदाधिकारी, कार्यकर्ते यांना तयारीला लगा असे आदेश दिल्याने या निवडणुका शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे. सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी तयारी करत असल्याने प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांनी त्याअनुषंगाने तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून महायुतीत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडे गेलेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पुन्हा स्वगृही घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते.

त्याचाच भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यापैकी महत्वाची असणाऱ्या पिंपरी चिंचवडवर लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा निवडणुकीत घड्याळाची साथ सोडून हातात तुतारी घेणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुन्हा स्वगृही घेण्यासाठी अजितदादा यांनी कंबर कसली आहे. त्यासंदर्भात अजितदादा आणि संबंधित पदाधिकारी यांचे सकारात्मक बोलणे ही झाल्याचे समजते.

याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटातून विधानसभेची निवडणूक लढलेले अजित गव्हाणे आणि त्यांचे समर्थक असणारे वीस माजी नगरसेवक व इतर पदाधिकारी हे पुन्हा हातावर घड्याळ बांधणार असल्याचे एका खाजगी वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना सुतावेच करीत आगामी महानगरपालिका निवडणुकीत आम्ही सर्वजण अजितदादा पवार यांच्या पक्षाचा प्रचार करणार असल्याचे माजी आमदार विलास लांडे यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात विलास लांडे यांनी एक वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत शरद पवार हे आमच्या हृदयात आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात नेहमीच श्रद्धा राहील असे स्पष्ट करीत महानगरपालिकेमध्ये १९९२ पासून अजितदादा पवार यांनी लक्ष घातले असून तेव्हापासून शहराचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे म्हटले आहे. या परिसराचा विकास हा केवळ अजित पवार यांच्यामुळेच झाला असल्याचे देखील विलास लांडे यांनी दावा केला आहे. याबाबत अजित गव्हाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.