‘ भोसरी ‘ विधानसभेच्या आखाड्यात जोर बैठकांचा आवाज लागलाय ‘घुमायला’
लोकमान्य टाइम्स : भोसरी
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. आता महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्याअनुषंगाने सत्ताधारी आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी तयारी सुरू केली आहे. २०१४ आणि २०१९ ची निवडणूक वेगळी होती. २०२४ ची निवडणूक वेगळया वळणावर आली आहे. पक्ष फोडून मतदारांचा विचार न करता फक्त राजकारण आणि त्यातून सत्ताकारण याला महत्व प्राप्त झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत मित्र पक्ष असणारे समविचारी पक्ष आता एकमेकांच्या समोर उभा ठाकले आहेत.
निवडणुका येतात आणि जातात त्यात दिलेली आश्वासने प्रत्येकवेळी पायदळी तुडविली जातात. निवडणुका जवळ आल्या की नवीन घोषणांचा पाऊस, जाती पातीच्या राजकारणाला खत पाणी घातले जाते. त्याचा त्रास सहन करावा लागतो तो सर्वसामान्य मतदारांना त्यामुळे जे मागे घडले तसेच ते पुढे चालत राहणार आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही .
विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांत निवडणुकीची विविध पक्षाकडून सद्या तरी स्वबळावर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील नेते मंडळी म्हणतायत लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूक ही महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी लढायची आहे. त्याअनुषंगाने सद्या शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू झाली आहे.
जिथे विद्यमानन आमदार आहेत तेथे त्या जागा त्यांनाच मिळणार हे जरी खरे असले तरी तीन तीन पक्ष एकत्रित येवून आघाड्या झाल्याने कोण एकालाच उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे इच्छूक असलेल्या इतर पक्षाच्या पदाधिकार्यांनी दुसरे पक्ष जवळ करणे सुरू केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीला जरी युती आणि आघाडी अशी लढत दिसत असल्या तरी विधानसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत इच्छुकांची संख्या वाढल्याने त्या निवडणुका स्वबळावरच होवू नयेत येवढे मिळविले….कारण राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे.
असो …
‘ बारा गाव दुसरी तेव्हा एक गाव भोसरी ‘ या बिरुदी प्रमाणे भोसरी ही कुस्ती, बैलगाडा शर्यत आणि कबड्डी खेळाबरोबरच येथील राजकारणासाठी प्रसिध्द आहे. खेळ असो या राजकारण भोसरी त्यात आघाडीवर असते हे काय नव्याने सांगण्याची गरज नाही.
भोसरी विधानसभेचा आखाडा जवळ येवू लागल्याने डाव प्रतिडाव टाकण्या अगोदर आपल्या गटात कोणता पैलवान येऊ शकतो याची चाचपणी सुरू झाली आहे. प्रतिस्पर्धी कोणते डाव मारण्यात पटाईत आहे, त्यात मातीतील पैलवान पुढे येणार की अत्याधुनिक खेळासाठी गादीच्या गटातून पुढे येणार याचे आराखडे बांधणे सुरू झाले आहे. त्याअनुषंगाने एकमेकाचे डाव प्रतिडाव काय असतील याबाबत माहिती संकलित करून तशी तयारी सुरू झाली आहे.
भोसरी विधानसभा केसरीची गदा दोनदा पटकाविणाऱ्या मल्ल जवळपास दहा वर्षांपासून या आखाड्यात खेळत आहे. त्याने स्वतः अनुभवातून अनेक डावांची तयारी केली आहे. त्यामुळे तो मातीतील असो या आंतरराष्ट्रीय नियमानुसार गादीवरून (नव्या दमाचा ) आखाड्यात कोणी ही येवू देत आम्ही त्याला चितपट करणारच असा प्रचंड आत्मविश्वास या मल्लाच्या समर्थकांना आहे.
तर यावेळी काही झाले तरी हे मैदान मारायचे यासाठी प्रतिस्पर्धी मल्लांनी तयारी केली आहे. जून्या वस्तादाचे डाव आत्मसाद करून महाराष्ट्राची कुस्ती जिंकणाऱ्या वस्तादाचे मार्गदर्शन घेण्याची तयारी ठेवल्याने यावेळी भोसरी विधानसभेचा आखाडा आणि त्यातील मुख्य गदेची लढत ही काटा होणार याबाबत दूजाभाव सद्या तरी दिसत नाही . त्यामुळे लहान गटात काटा कुस्ती करणाऱ्यांनी आता तेथील चार वेळेच्या जिंकण्याच्या अनुभवातून मोठ्या जोडीत कुस्ती खेळण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
त्यादृष्टीने अनुभवी आणि गदेचा मानकरी असणाऱ्या मल्लाला चितपट करण्यासाठी मेहनत वाढवली आहे. आखाड्यात कुस्ती खेळण्यास उतरणार म्हणून चालत नाही त्यासाठी नियोजन, जीवापाड मेहनत, सातत्य, वेगवेगळे डावपेच शिकत जेवढा खुराक घेतला आहे तो पचविण्यासाठी व्यायामाबरोबर सरावासाठी तोडीचे मल्ल बरोबर घेत मोठे मैदान मारायची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.
त्याअनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध तालमितील मल्ल व्यायाम करत असल्याचा आवाज घुमू लागला आहे. विविध अनुभवी मल्लाकडून प्रतिस्पर्धी गदेच्या मानकऱ्याचे डाव, त्याचा सर्वात आवडता डाव कोणता याबाबत माहिती घेणे सुरू झाले आहे. त्यात भोसरी म्हंटल की कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीसाठी पुणे पंचक्रोशीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नावाजलेल गाव. त्यामुळे या गावचा कुस्त्यांचा आखाड्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दोन वेळा गदा जिंकलेला मल्ल हा सरावात सर्वांच्या पुढे आहे, जून्या आणि नव्या दमाच्या मल्लासोबत सराव, मैदान कधी ही असो त्यासाठी सातत्याने सराव करण्यात आघाडीवर, त्यामुळे कोणतेही मैदान असुद्यात मैदानावर आला की नमस्कार करून मैदानाचा एक राऊंड मारला की त्याचे दिलं जोरात चालत हे पहिल्या दोन निवडणुकीच्या आखाड्यात पाहिले आणि अनुभविले आहे.
त्यामुळे प्रतिस्पर्धी मल्लाच्या मनात काय चालतं याचा अंदाज घेवून स्थानिक वस्ताद यांच्या डावपेचासह अनुभवाच्या जोरावर प्रतिस्पर्धी मल्लाने आपल्या आवडत्या डावाचा अभ्यास केला असणार हे गृहीत धरून त्यात त्याला आपल्याच डावात अडखून समोर येणाऱ्या कसलेला असो या नवोदित मल्लाला चितपट करण्यासाठी कॉश्यूम चाढविल्याची चर्चा आहे.