पिंपरी चिंचवडपुणे

पुणे, पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक कोंडीवर उन्नत कॉरिडॉरचा उतारा

  • उन्नत कॉरिडॉरमुळे पुणे पिंपरी-चिंचवड वाहतूक कोंडी फुटणार
  • नऱ्हे ते देहू रोडपर्यंत पुणे-बेंगळुरू एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा निर्णय
  • ३२ किलोमीटरचा उन्नत कॉरिडॉर प्रकल्प जलदगतीने राबविण्याचे आदेश
  • सहा हजार कोटी रुपये होणार खर्च
    लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
    पुणे बेंगळुरू महामार्गावरील वाहतुकीवरील प्रचंड दबाव आणि वाढत्या शहरीकारणामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी केंद्र सरकारने गती दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील प्रस्तावित उन्नत कॉरिडॉरचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या बैठकीत नितीन गडकरी यांच्या उच्चस्तरीय बैठकीत प्रकल्पाचा पाठपुरावा करताना लवकरच तो केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल असे सांगितले आहे. मंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना निविदा प्रक्रिया देखील तात्काळ सुरु करण्याचे आदेश दिले, जेणेकरून मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर वेळ वाया न घालवता प्रकल्प पुढे नेता येईल . एनएचएआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते हा निर्णय प्रकल्पाला आवश्यक गती देण्यासाठी महत्वाचा टप्पा आहे.


३२ किलोमीटर लांबीचा हा उन्नत कॉरिडॉर अंदाजे पाच हजार पाचशे ते सहा हजार कोटी खर्चाचा असून गेल्या जवळपास चा वर्षांपासून तो केवळ कागदावरच आहे. या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आधीच तयार करण्यात आला आहे. या योजनेचे दोन पॅकेजस करण्यात आले आहेत. देहू रॉड ते पाषाण सूर आणि पाषाण सुस ते नऱ्हे असे करण्यात आले आहे. सुरुवातीच्या आराखड्यात पहिले पॅकेज बालेवाडी स्टेडियमपर्यंत मर्यादित होते. मात्र हिंजवडी परिसरातील आय टी व्यावसायिक दैनंदिन प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांच्या मागणीमुळे पॅकेज पाषाण-सुसपर्यंत वाढविण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकल्पाला विलंब का झाला याबाबतही चर्चा झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करत प्रकल्पाच्या दीर्घकाळ सुरु असणाऱ्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी गडकरी यांनी स्पष्ट केले होते की विद्यमान सवलती देणाऱ्या कंपनीसोबत लवाद सुरु असल्यामुळे प्रगती अडखळत आहे. हीच कंपनी सध्या देहू रॉड शेंद्रे या १४० किलोमीटर लांबीच्या मार्गाची देखभाल करते आणि टोल वसुली करते. एनएचआयच्या अधिकाऱ्याच्या मते या कायदेशीर वादावर तोडगा निघण्याच्या उंबरठ्यावर असून लवकरच प्रकल्प गतिमान होईल.

याशिवाय एनएचआय ने पावसाळा संपल्यानंतर पुणे महानगर प्रदेश आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची तयारी केली आहे. सध्याचे १२ मीटर सेवा रस्ते २४ मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती जागा मिळविण्यासाठी म्हणून नागरी प्रशासनाने अलीकडेच ११० अनधिकृत बांधकामे हटवली आहेत. या निर्णयामुळे सेवा रस्ते अधिक रुंद व मोकळे होतील, ज्याचा फायदा स्थानिक वाहतूक व्यवस्थेला होईल.