…परंतु जयंतरावांच्या ईश्वरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने
- जयंत पाटील यांनी अनेक दिवस ठाण मांडल्याने ईश्वरपूरच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष
- बिहारच्या दणदणीत विजयामुळे महायुतीत उत्साह
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
होय माझे साहेबांच्यावर प्रेम आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मनात आहे ते ओठावर आणून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यादृष्टीने अनेक जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्रित येताना दिसत आहेत.
त्यात ईश्वरपूरच्या वेशीवर असणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनोमिलन झाले आहे ; मात्र ईश्वरपूर नगरपरिषदमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीच्या बरोबर राहून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
त्यामुळे या निकालाकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीमध्ये जातीने लक्ष घालून स्थानिक महायुतीतील अंतर्गत धुसपूस मिटवून जिल्हा निवडणुक प्रभारी आमदार सत्यजित देशमुख (जयंत पाटील यांचे साडू ) , माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, जिल्ह्याचे ग्रामीण अध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह एकनाथ शिंदे शिवससेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, राष्ट्रवादी अजित पवार जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जयवंत(आबा) पाटील यांना बरोबर घेत नव्या दमाने मोट बांधली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जयंत पाटील यांच्यासमोर नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून तगडे आव्हान उभे केले आहे. हे जरी खरे असले तरी या निवडणुकीत आनंदराव मलगुंडे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करून जयंतराव यांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आहे.
२०१९ च्या निवडणुकीमध्ये निशिकांत पाटील यांनी कमळ चिन्हावर विजय मिळवीत जयंत पाटील यांना धक्का दिला होता. तर एकूण नगरसेवकांच्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक घडामोडी झाल्या. २०२३ नंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित महायुती म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोट बांधली.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ही महायुतीने दमदार विजय मिळवीत २८८ पैकी २३६ जगावर विजय मिळविला. महाविकास आघाडीची पूर्ती धुळधाण उडाली. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त १० जागेवरच विजय मिळविता आला. जे जयंत पाटील लाखाच्या फरकाने निवडून यायचे ते अवघ्या १२ हजाराने निवडून आले. त्यामध्ये पूर्ण मतदारसंघात ईश्वरपूर शहरातील मतदारांनी हात दिल्यामुळे ते तरले.
जयंत पाटील यांचे मताधिक्य कमी झाल्यामुळे महायुतीमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यात एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षांना बरोबर घेऊन भाजपने ईश्वरपूर नगर परिषद पुन्हा ताब्यात घेण्यासाठी महायुतीने जोरदार तयारी केली आहे. काही काळ जयंत पाटील यांच्याबरोबर राहिलेले पूर्वाश्रमीचे भाजपचे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी पुन्हा भाजपमध्ये पुनरागमन केले आहे. त्यांचे चिरंजीव विश्वनाथ डांगे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.
राज्याचे नेतृत्व करणारे जयंत पाटील यांना सांगली जिल्ह्यातच रोखण्याचा प्रयत्न भाजप कडून करण्यात येत आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. शांत, सयंमी आणि अभ्यासू नेतृत्व अशी ओळख राज्यभर आहे. विरोधकांनी किती ही टीका टिपणी केली तरी त्याला थेट उत्तर न देता टप्प्यात आला की कार्यक्रम करायचा असा त्यांचा खाक्या असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीत अंतर्गत धुसपूसीवर लक्ष ठेवून त्यांनी नियोजन बद्ध कार्यक्रम सुरु केल्याची चर्चा आहे.
तर महायुतीत उमेदवारांच्या मुलाखतीवरून भाजपमध्ये निर्माण झालेली अंतर्गत दुही तात्पुरती तरी मिटविण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना यश आले आहे. राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आली तरी ईश्वरपूर मध्ये मात्र स्थानिक पातळीवर जयंत पाटील यांना नमोहरम करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असल्याने येथे मतदार कोणाच्या पारड्यात मतदानाचे दान टाकणार हे ३ डिसेंबर च्या निकालावरून स्पष्ट होणार आहे.

